Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 06:49 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देखील सीबीआय चौकशीची मागणी करुन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) केली आहे.

मुंबई : नीट - यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याकरिता पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला (एनएमसी) पत्र लिहिणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देखील सीबीआय चौकशीची मागणी करुन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. त्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. 

नीट - यूजीच्या माहितीपत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता. तरीही दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना  ग्रेस मार्क दिल्याने ऑल इंडिया रँकिंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ओएमआर शीट आणि गुण स्कोअर कार्डशी जुळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. 

पालकांची भीतीराज्यातील अनेक विद्यार्थी बाहेरील संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. ऑल इंडिया कोट्यातील जागा त्यांना मिळणार नाहीत. अशाने सरकारी तर सोडाच राज्यातील खासगी कॉलेजातही प्रवेश मिळणार नाही. एनटीएने ग्रेस मार्कांच्या नावाखाली १०० ते १५० गुणांची खिरापत काही विद्यार्थ्यांना वाटली आहे. त्यामुळे कटऑफ वाढला असून, राज्यातील सरकारी कॉलेजात सोडाच खासगी मेडिकल कॉलेजलाही प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.- संदेश सावंत, पालक

टॅग्स :हसन मुश्रीफ