Join us  

सीबीआयकडून इंद्राणी मुखर्जीकडे चौकशी; दिल्लीतील पथक भायखळा कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:51 AM

आयएनएस मीडिया कंपनीचे संस्थापक असलेला पीटर व त्याची पत्नी इंद्राणी हे त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी गेल्या साडेतीन वर्षांपासून कारागृहात आहेत.

मुंबई : बहुचर्चित आयएनएक्स मीडियातील गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने मंगळवारी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिच्याकडे कसून चौकशी केली. सीबीआयच्या अटकेत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे केलेल्या तपासाच्या अनुषंगाने इंद्राणीकडे विचारणा केली आहे. आवश्यकतेनुसार तिच्याकडे व तिचा पती पीटर मुखर्जीची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आयएनएस मीडिया कंपनीचे संस्थापक असलेला पीटर व त्याची पत्नी इंद्राणी हे त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी गेल्या साडेतीन वर्षांपासून कारागृहात आहेत. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २००७ मध्ये कंपनीच्या परदेशातील ३०५ कोटींच्या गुंतवणुकीसाठी मदत केली. त्याबदल्यात त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्यामार्फत लाच घेतल्याची माहिती दिली होती. त्याच्या आधारावर सीबीआयने गेल्या आठवड्यात चिदंबरम यांना अटक केली असून त्यांच्यावर ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.इंद्राणीकडे चौकशी करण्याची परवानगी देण्याबाबत सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर दिल्लीतील पथक सोमवारी रात्री मुंबईला पोहोचले. भायखळा महिला कारागृहात मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास अधिकारी पोहोचले. त्यांनी दोन टप्प्यांत सुमारे चार तास इंद्राणीकडे आयएनएक्स मीडियातील गुंतवणूक, चिदंबरम यांच्याकडून मिळालेल्या सवलतीबाबत सविस्तर विचारणा केली. पाच वाजण्याच्या सुमारास पथक कारागृहातून बाहेर पडले. आवश्यकतेनुसार इंद्राणीकडे आणखी विचारणा केली जाईल. तसेच आर्थर रोड कारागृहात असलेल्या पीटर मुखर्जीकडेही विचारणा केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जीगुन्हा अन्वेषण विभाग