Join us

काेविड लस : राज्याला हवे १७ लाख, मिळाले फक्त साडेनऊ लाख डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 06:16 IST

लसींचा अपेक्षित पुरवठा झाला नसून त्या संदर्भात केंद्र शासनाला कळविण्यात आल्याचे टोपे म्हणाले. महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिव्यक्ती दोन डोस यानुसार १७ लाख कोरोना प्रतिबंधक लसींची गरज होती. मात्र, केंद्र सरकारकडून प्रत्यक्षात साडेनऊ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. शिवाय, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांची संख्यादेखील कमी केली आहे. येत्या १६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाचा शुभारंभ करतील; त्या वेळी जालना आणि कूपर रुग्णालयांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. 

लसींचा अपेक्षित पुरवठा झाला नसून त्या संदर्भात केंद्र शासनाला कळविण्यात आल्याचे टोपे म्हणाले. महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी (पान १ वरून) प्रतिव्यक्ती २ याप्रमाणे सुमारे १६ लाख डोस अपेक्षित होते. त्याचबरोबर हाताळणीमुळे अथवा अन्य कारणामुळे खराब झाल्यास १० टक्के डोस अतिरिक्त दिले जातील, असे सांगण्यात आले होते. या हिशेबाने महाराष्ट्राला १७ लाख डोस मिळायला हवे होते. लसीकरण केंद्रांची  संख्याही कमी करण्यात आली आहे. आपल्याकडे ५११ केंद्रे असतील, पण आता फक्त ३५८ लसीकरण केंद्रे पहिल्या टप्प्यात असतील.

सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू होती. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्रे उपलब्ध आहेत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले.  

७ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणीकोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  १७ हजार ७४९ वॅक्सिनेटर्सची व ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.  लसीकरण केंद्रांची संख्याही कमी केली. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांची संख्याही कमी केली असून ५११ ऐवजी आता ३५८ लसीकरण केंद्र महाराष्ट्रात असतील. अहमदनगर-१५, अकोला-४, अमरावती-६, औरंगाबाद-१३, बीड-६, भंडारा-४, बुलढाणा-७, चंद्रपूर-८, धुळे-५, गडचिरोली-५, गोंदिया-४, हिंगोली-३, जळगाव-९, जालना-६, कोल्हापूर-१४, लातूर-८, मुंबई-५०, नागपूर-१५, नांदेड-६, नंदुरबार-५, नाशिक-१६, उस्मानाबाद-४, पालघर-६, परभणी-४, पुणे-३९, रायगड-५, रत्नागिरी-६, सांगली-१२, सातारा-११, सिंधुदुर्ग-४, सोलापूर-१३, ठाणे-२९, वर्धा-८, वाशिम-४, यवतमाळ-६ असे एकूण ३५८ केंद्र करण्यात आली.

 एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरणआरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून, एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे. 

 

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई