Join us  

रिक्षा, टॅक्सीचालकांची सावध भूमिका; अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवाही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 6:18 AM

प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल केल्यानंतर रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर आल्या आहेत; पण त्या तुलनेत संख्या कमी आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई होत असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी सावध भूमिका घेतली आहे. अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू झाली असली तरी त्याला प्रवाशांचा प्रतिसाद कमीच आहे.

मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये टॅक्सी सेवा बंद असल्याने अनेक चालकांची, त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत होती. रेल्वे आणि विमानतळावर टॅक्सी सुरू झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी सुटला होता. पण अनेक चालक घरीच होते. शुक्रवारपासून निर्बंध आणखी शिथिल झाल्याने चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ताडदेव, हाजीअली परिसरात आजही अनेक टॅक्सी चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

लॉकडाऊन आहे, कोरोनाच्या भीतीने अनेक लोक बाहेर पडत नाहीत. चालकांना जास्त प्रवासी मिळत नाहीत. १०० ते २०० रुपये मिळतात त्यातच पोलिसांनी कारवाई केली तर ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे चालक सावध भूमिका घेत आहेत, असे क्वाड्रोक्स यांनी सांगितले.तर दोन महिने टॅक्सी बंद होती. आज टॅक्सी बाहेर काढली आहे; पण दिवसभरात दादरला दोन ते तीन भाडी मिळाली, असे एका टॅक्सी चालकाने सांगितले.

अ‍ॅप आधारित ओला, उबेरची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. पण लोक अजूनही घराबाहेर पडत नसलयाने या सेवेलाही कमी प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस