Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:58 IST

पोलिसांनी आ. लाड यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. १ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील विकास कामासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचे हमीपत्र मुंबई जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वीय सहायक सचिन राणे यांच्याकडून समजले.

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट लेटरहेड तसेच स्वाक्षरीच्या आधारे ३.६० कोटींचा विकास निधी लाटण्याच्या प्रकरणात सायन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामागचा सूत्रधार कोण? याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी आ. लाड यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. १ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील विकास कामासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचे हमीपत्र मुंबई जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वीय सहायक सचिन राणे यांच्याकडून समजले. मात्र असे कोणतेही हमीपत्र दिले नसल्याने त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा हमीपत्र रत्नागिरीच्या नियोजन कार्यालयातून मेलद्वारे मिळाल्याचे सांगण्यात आले. हमीपत्र रद्द करण्यास सांगून कामाची यादी, कागदपत्रे मागवताच बनावट लेटरहेड स्वाक्षरीचा आधार घेतल्याचे आढळले.

निलेश वाघमोडे नावाच्या व्यक्तीने दिली कागदपत्रे

पत्राचा नमुना हा भाजप प्रदेश उपाध्यक्ष असतानाच्या लेटरहेडप्रमाणे आहे. मोबाईल क्रमांकही चुकीचे आहेत. याबाबत बीडच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे चौकशी करताच प्रशांत लांडे नावाच्या व्यक्तीने ही कागदपत्रे जमा केल्याचे तेथून सांगण्यात आले.

लांडेने निलेश वाघमोडे नावाच्या व्यक्तीने ही कागदपत्रे दिल्याची माहिती दिली. वाघमोडेने सचिन बनकरचे नाव पुढे केले. त्यानंतर बनकरने उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास नकार दिला. शासकीय निधीवर डल्ला मारण्याच्या दृष्टीने या टोळीने संगनमत करत बनावट कागदपत्रे सादर केली.

तसेच, एका अनोळखी क्रमांकावरून कॉल करून प्रसाद लाड बोलत असल्याचे भासवून तेथील कर्मचाऱ्यांना हमीपत्र घेण्यास भाग पाडल्याचा आरोप लाड यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार, सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

टॅग्स :प्रसाद लाडविधानसभा