चीनमध्ये कहर करणाऱ्या HMPV व्हायरसची प्रकरणं आता भारतातही दिसू लागली आहेत. मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. एका ६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं. चिमुकलीला उपचारासाठी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलगी १ जानेवारीपासून रुग्णालयात दाखल होती. मात्र आता उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ह्युमन मेटापन्युमोव्हायरस (HMPV) हा श्वासोच्छवासाच्या आजारांना कारणीभूत ठरणारा व्हायरस म्हणून ओळखला जातो. हा व्हायरस लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. आता भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत. कर्नाटकात एचएमपीव्हीची दोन प्रकरणं नोंदवली गेली असताना मुंबईत ६ महिन्यांच्या मुलीला व्हायरसची लागण झाली होती.
HMPV ची लक्षणं
- श्वास लागणे- सतत खोकला - नाक गळणे- ताप येणे- घसा खवखवणे- ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया देखील असू शकतो
HMPV व्हायरसचा धोका कोणाला जास्त?
हा व्हायरस गंभीर संसर्गास कारणीभूत ठरू शकतो, विशेषतः लहान मुलं, वृद्ध लोक आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना याचा जास्त धोका आहे. बहुतेक लोकांना खोकला आणि सर्दीसारखे वाटतं. केंद्र सरकारने याबाबत एक ॲडव्हायजरी जारी केली असून, याला घाबरण्याची गरज नाही आणि राज्य सरकारांनीही सतर्क राहावं, असं म्हटलं आहे.
चीनमध्ये हाहाकार माजवणारा HMPV व्हायरस आता भारतात पोहोचला आहे. कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूनंतर आता महाराष्ट्रातही या व्हायरसने प्रवेश केला आहे. नागपुरात दोन मुलांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं असून, मंगळवारी देशभरातील एकूण रुग्णांची संख्या ७ झाली आहे. मात्र, मुंबईच्या रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.