खटल्याची माहिती क्लिकवर
By Admin | Updated: December 20, 2014 01:11 IST2014-12-20T01:11:30+5:302014-12-20T01:11:30+5:30
न्यायालयातील खटल्यांची माहिती अशिलांना सहज मिळावी यासाठी न्यायालयीन प्रणाली कात टाकत आहे.

खटल्याची माहिती क्लिकवर
प्रशांत शेडगे, पनवेल
न्यायालयातील खटल्यांची माहिती अशिलांना सहज मिळावी यासाठी न्यायालयीन प्रणाली कात टाकत आहे. जिल्हा न्यायालयात हायटेक माहिती कोष बसविला असून केवळ एका क्लिकवर खटल्यांसदर्भातील सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे वादी-प्रतिवादी, अधिकारी, वकिलांना अधिक फायदा होणार आहे.
पनवेल तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षात तालुक्याचा विस्तार झाला असून वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा अशी सात पोलीस ठाणी आहेत. या ठिकाणी दररोज वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होते. त्याचा निवाडा पनवेल न्यायालयात केला जातो. या व्यतिरिक्त या प्रदेशात येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय प्रकल्प, सिडको, नयना या माध्यमातून होत असलेली टाऊनशीप या पार्श्वभूमीवर जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातून अनेक वाद अािण तंटे होत असून त्यासंदर्भातील दावेही न्यायालयात सुनावणीकरिता येतात.
पनवेल न्यायालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या ठिकाणच्या पाच कक्षातून दररोज हजारो वादी आणि प्रतिवादी, वकील पनवेल न्यायालयात हजेरी लावतात आणि आपल्या खटल्यांसंदर्भात माहितीकरिता संबंधित कोर्टातील कारकुनाकडे गर्दी करतात. कित्येकांना आपला दावा कोणत्या न्यायालयात आहे, याची माहितीही नसते.
वकीलांनाही आपल्या अशिलाची पुढील तारीख केव्हा आहे, खटल्याचे स्टेटस काय आहे, याबाबत कारकून विभागातून माहिती घ्यावी लागते. संबंधीत टेबलवर अनेक कामे असल्याने माहिती घेण्याकरिता ताटकळत उभे राहावे लागते. एकीकडे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होत असताना न्यायालयात त्याचा वापर काहीसा कमी होत आहे. यावर उपाय म्हणून आता रायगड जिल्हा न्यायालयाच्यावतीने पनवेलला माहिती कोषक बसविण्यात आला आहे.