कामासाठी व्यंगचित्रकारांचे उपोषण!
By Admin | Updated: November 8, 2016 02:58 IST2016-11-08T02:58:04+5:302016-11-08T02:58:04+5:30
गेल्या १३ वर्षांपासून पंचायत समितीपासून महानगरपालिका स्तरावर स्वच्छतेसाठी समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या संस्थेला स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने कामापासून वंचित ठेवले आहे

कामासाठी व्यंगचित्रकारांचे उपोषण!
मुंबई : गेल्या १३ वर्षांपासून पंचायत समितीपासून महानगरपालिका स्तरावर स्वच्छतेसाठी समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या संस्थेला स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने कामापासून वंचित ठेवले आहे. स्वच्छतेच्या जाहिरात पॅनेलवर नियुक्ती होऊनही गेल्या दोन वर्षांपासून हाती काम नसल्याने संस्थेचे पदाधिकारी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
यासंदर्भात संस्थेचे सचिव व्यंगचित्रकार धनंजय गदळे यांनी सांगितले की, बीडच्या पंचायत समित्यांपासून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेपर्यंत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळ करत आहे. संस्थेला असलेला १० वर्षांहून अधिक अनुभव पाहता राज्य शासनाने २०१४ साली संस्थेची निवड स्वच्छतेच्या जाहिरात पॅनेवर केली. यावेळी संस्थेला राज्यभर व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम मिळेल, असे आश्वासितही करण्यात आले. त्यासाठी मुंबई, पुणे येथे कार्यालय, पोस्टर लावण्यासाठी कर्मचारी भरती अशा विविध अटी पूर्ण करण्यास सांगितले. मात्र सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्यानंतरही काम देण्यासाठी दोन वर्षांपासून शासनस्तरावर टाळाटाळ होत असल्याचा आरोप गदळे यांनी केला आहे.
उपोषणाला बसलेले संस्थेचे अध्यक्ष नरहरि गदळे म्हणाले की, ज्या संस्थांची नावे यादीत नाहीत, अशा अनेक संस्थांना स्वच्छता अभियानाची कामे देण्यात आली आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने अनेकदा संस्थेला व्यंगचित्रासाठीचे काम देण्याचे कबूल केले होते.
११ जून २०१४ रोजीपासून सरकारच्या यादीवर संस्था आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या केवळ तीनच संस्था राज्यात काम करत असताना ऐनवेळी यादीबाहेरील संस्थांना कामे दिल्याचा आरोप गदाळे यांनी केला आहे. शिवाय यासंदर्भात राज्यपालांनाही पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)