Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local: आजपासून रेल्वेकोंडी, २७ तासांचा मेगाब्लॉक, चाकरमान्यांनाे घराबाहेर पडताना विचार करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 09:24 IST

Carnac Bridge: मध्य रेल्वे मार्गावरून जाणारा कर्नाक पूल तोडण्यासाठी उद्या, शनिवारी रात्री अकरापासून होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे दोन दिवस रेल्वे वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्यावर उपाय म्हणून बेस्ट काही जादा बस सोडणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून जाणारा कर्नाक पूल तोडण्यासाठी उद्या, शनिवारी रात्री अकरापासून होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे दोन दिवस रेल्वे वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्यावर उपाय म्हणून बेस्ट काही जादा बस सोडणार आहे. मात्र, २७ तासांच्या रेल्वे मेगाब्लॉकमुळे उपनगरी गाड्यांच्या जवळपास निम्म्याहून अधिक फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करायचा असेल तर रेल्वेकोंडीत अडकणार याची मानसिक तयारी करूनच बाहेर पडा.

शनिवारी रात्री अकरा, रविवारी संपूर्ण दिवस आणि सोमवार सुरू होताना दोन तास असा हा २७ तासांचा मेगाब्लॉक असेल. या काळात मध्ये रेल्वेच्या मुख्य मार्गावरील फेऱ्या भायखळ्यापर्यंत जातील. मात्र, तेथे गाड्या क्रॉस करून माघारी फिरवण्याची पुरेशी सोय नसल्याने तेथून मर्यादित फेऱ्या होतील. परळ, दादर, कुर्ला, ठाणे येथून काही गाड्या माघारी वळवण्यात येणार असल्या, तरी त्या फेऱ्याही नेहमीप्रमाणे होण्याची शक्यता नाही. या काळात काही विशेष लोकल सोडण्यात येतील. मात्र, त्याबाबतची माहिती मध्य रेल्वेने जाहीर केलेली नाही. 

या मार्गावरील वाहतूक २७ तास पूर्ण बंद   मुख्य मार्ग : अप आणि डाऊन - भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्ग : अप आणि डाऊन - वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

रेल्वेच्या उपाययोजना   प्रत्येक स्थानकावर उद्घोषणा,  प्रत्येक स्थानकावर मदत कक्ष (हेल्प डेस्क)  प्रत्येक स्टेशनवरील बंदोबस्तात वाढ  प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेशा तिकीट परतावा खिडक्या. 

 कसा बसेल फटका?मेगाब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील लोकल भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवरून माघारी फिरवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापुढील सर्व स्थानकांदरम्यान फेऱ्या नेहमीपेक्षा कमी होतील. याच काळात हार्बर मार्गावर वडाळ्याहून गाड्या माघारी पाठवल्या जातील. वडाळा रोड, कुर्ला आणि त्यापुढील सर्व स्थानकांदरम्यान फेऱ्या नेहमीपेक्षा कमी होतील.रविवारी, २० नोव्हेंबरला वातानुकूलित लोकल, १५ डब्यांच्या लोकल आणि रविवारच्या वेळापत्रकात रद्द असणाऱ्या गाड्या चालविल्या जाणार नाहीत.  

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वेमुंबई लोकल