Join us

केअर टेकरच निघाला चोर; वृद्धाच्या घरातील ३ लाखांवर हात साफ, कफपरेड येथील घटना

By मनीषा म्हात्रे | Updated: August 25, 2023 13:39 IST

केअर टेकरनेच घरातील ३ लाखांच्या ऐवजावर हात साफ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कफपरेड येथे ९१ वर्षीय वकिलाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या केअर टेकरनेच घरातील ३ लाखांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी केअर टेकर दीपक सोलंकी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

कफपरेड परिसरात तक्रारदार ९१ वर्षीय सेवानिवृत्त वकील ८५ वर्षीय पत्नीसोबत राहतात. स्वतःच्या देखभालीसाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच ३० वर्षीय सोलंकीला याला नोकरीवर ठेवले. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत तो कामावर येत होता. पत्नीच्या खोलीतील पलंगामध्ये त्यांनी पैशांचा बॉक्स ठेवला होता. यातूनच, घरखर्च तसेच अन्य बाबीसाठी पैसे घेत होते. २१ ऑगस्ट रोजी डोळ्यांच्या डॉकटरकडे जाण्यासाठी पैशांचा बॉक्स उघडून पाहताच त्यात, रक्कम कमी असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये एकूण ३ लाख रुपये कमी होते. केअर टेकरनेच यावर हात साफ केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारी