Join us  

‘अनलॉक वन’ची सावध सुरुवात; व्यापाऱ्यांसमोर कामगारांची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 6:59 AM

मुंबईत रस्त्यावरील वर्दळ वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘अनलॉक वन’ची सावध सुरुवात मुंबईत शुक्रवारी झाली. नेहमीप्रमाणे अत्यावश्यक दुकाने सुरू होती. मात्र, इतर दुकाने पूर्ण क्षमतेने उघडली गेली नाहीत. स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत साशंकता, कामगारांची कमतरता आणि ग्राहकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे साधारण वीस टक्केच दुकाने सुरू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तुलनेने रस्त्यावरील वर्दळ मात्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले.

अनलॉक वनमुळे लगेच व्यवहार सुरू होतील, हा अंदाज आज एका अर्थाने फोल ठरला. राज्य सरकारकडून सरसकट परवानगी मिळाली तरी स्थानिक प्रशासन विशेषत: वॉर्ड अधिकारी आणि पोलिसांकडून येणाºया सूचनेवरच दुकानदार आणि व्यापाऱ्यांची भिस्त होती. याबाबत खात्रीलायक, स्पष्ट माहिती आल्यावरच दुकाने उघडण्याची भूमिका बहुतांश दुकानदारांनी घेतली. दुकाने उघडताना निर्जंतुकीकरण, ग्राहकांसाठी हॅँड सॅनिटायझर, शारीरिक अंतरासाठीचे मार्किंग करणे अद्याप बाकी होते. दोन महिने दुकाने बंद असल्याने आवश्यक साफसफाई व मांडणीही बाकी होती. त्यामुळे जी काही थोडीबहुत दुकाने उघडली तेथेही हीच कामे केली जात होती. त्यामुळे ही दुकाने पूर्ण क्षमतेने उघडली गेली नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप सुरू झालेली नाही.

परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेल्याने कामगारांचीही कमतरता होतीच. ज्वेलर्स, स्टेशनरी, कपडे विशेषत: होजियरीची दुकाने प्रामुख्याने उघडी होती. घरगुती भांड्याची दुकाने, छत्री, रेनकोट आदींची विक्री करणारी दुकाने चालू होती. दुकाने उघडली गेली तरी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. त्यातल्या त्यात पावसाळी खरेदीसाठी काही ठिकाणी ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली. याशिवाय, होजियरी दुकानातही थोड्याफार प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. अनलॉकमुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी मात्र वाढली. दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावत होती. मात्र, वाहनांतील संख्येचे निकष पाळले जात असल्याचे चित्र नव्हते.

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असला तरी याबाबत नागरिकांमध्ये उदासीनतेचे चित्र होते. अनेक ठिकाणी मास्क खाली करून बोलणाºया नागरिकांमुळे मास्क लावण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात होता. या असल्या पळवाटांमुळे कोरोनाचा धोका वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस