मुंबई - सणासुदीचे दिवस असल्याने गोड पदार्थांत, चहा-दूध, मसाले, मुखवाससाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या वेलची भाव सध्या ४,५०० ते पाच हजार रुपये किलो आहे. वेलचीच्या आकार व सुगंधावरून वेलचीचे भाव ठरविले जातात.
गेल्या चार-पाच महिन्यांत वेलचीचे भाव चढेच राहिले. मात्र, आता सणासुदीच्या काळात वेलचीचे भाव ४,५०० रुपयांवर स्थिर राहिले आहेत. वेलची अती महाग झाल्याने लोकांनी गोड पदार्थांत वापर करणे टाळले. वेलचीची सध्या आवक वाढली आहे आणि त्या तुलनेने मागणी घटली आहे. वेलचीच्या आकार व सुगंधानुसार वेलचीचे दर वेगवेगळे आहेत. ग्राहकाला ५० ग्रॅम वेलची मागे २३९ रुपये, तर काही वेलची १७९ रुपये, तर दर्जेदार वेलची ३१० रुपयांना ५० ग्रॅम या दरात विकण्यात येत आहे. या दरामुळे सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थ बनविणाऱ्या गृहिणींच्या चिंतेते वाढ झाली आहे.
आरोग्यासाठी गुणकारी; अनेक समस्यांवर उपयुक्त वेलची केवळ स्वादासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही महत्त्वाची आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असून, पचन, हृदय, रक्तदाब, ॲसिडिटी, बद्धकोष्टता आणि तोंडाचा दुर्गंध कमी करते. दात आणि हिरड्यांच्या समस्यांवरही वेलची उपयुक्त आहे. मात्र, वाढत्या किमतीमुळे वेलची आरोग्यासाठी वापरणे सामान्यांना शक्य होत नाही.