कार दरीत कोसळून दोघी ठार
By Admin | Updated: December 28, 2014 01:58 IST2014-12-28T01:58:28+5:302014-12-28T01:58:28+5:30
मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या कारला मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात होऊन कार २५० फूट खोल दरीत कोसळली.

कार दरीत कोसळून दोघी ठार
कसारा : मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या कारला मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात होऊन कार २५० फूट खोल दरीत कोसळली. यात माय-लेकीचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. त्यापैकी एक महिला गंभीर जखमी आहे. सीतारादेवी पांडे (५५), शशी पांडे (१५) अशी मृतांची नावे आहेत. या माय-लेकी मुंबईच्या आहेत.
मुंबईतील पांडे कुटुंबीय गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास शिर्डीला निघाले होते. कसारा घाटत नागमोडी वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी संरक्षण कठड्यावर आदळली. परंतु, कठडा निकृष्ट दर्जाचा असल्याने तो तुटून गाडी खोल दरीत कोसळली. प्रसंगावधान राखून गाडीतील शशीधर पांडे, बालमुकुंद पांडे, बबली पांडे यांच्यासह श्यामा पांडे यांनी गाडीतून उड्या मारल्या. श्यामा पांडे या गंभीर जखमी असून सर्व जखमींवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय वसावे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, महामार्गाचे काम करणाऱ्या ‘गॅमन इंडिया’ची क्रेन, रुग्णवाहिका व अन्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचली नव्हती.
पोलीस व हाय वे कर्मचाऱ्यांची दमछाक
दरम्यान, २५० फूट खोल दरीत गेलेल्या आय-२० कारमधील जखमी व मृतांना बाहेर काढताना पोलीस व गॅमन हाय वे पथकाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली. अंधारात कसारा पोलीस अधिकारी अजय वसावे, महामार्ग पोलीस अधिकारी ठोंबरे, कर्मचारी चेतन दराडे, आयएसआय सांगळे, पठाण, पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक घोसाळकर यांच्यासह हाय वे पथकाने रात्रीच्या अंधारात दरीत उतरून या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी रेल्वेच्या इंजीनमधून जखमींना हलविल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले. (वार्ताहर)
निकृष्ट संरक्षक
कठडे ठरले घातक
कसारा घाटात खोल दरी असलेल्या बाजूने संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत, मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने या निष्पापांचा जीव गेल्याचे समजते. मातीमिश्रित असलेल्या या कठड्यात जर ठेकेदाराने लोखंडी सळई वा रॉड वापरले असते आणि सिमेंट काँक्रीटचे कठडे बांधले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती.