उमेदवारांचे अजेंडे बदलले!
By Admin | Updated: October 7, 2014 02:15 IST2014-10-07T02:15:53+5:302014-10-07T02:15:53+5:30
पूर्वी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अग्रक्रमाने दिसणारे रोटी, कपडा हे महत्त्वाचे मुद्दे आता गायब झाले

उमेदवारांचे अजेंडे बदलले!
मुंबई : पूर्वी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अग्रक्रमाने दिसणारे रोटी, कपडा हे महत्त्वाचे मुद्दे आता गायब झाले असून, त्यांची जागा वायफायने घेतली आहे. रोटी आणि कपडा या मुद्द्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. परंतु, काळाच्या ओघात त्याच-त्याच घोषणांचा वापर प्रचारात केला; तर फारसा फायदा होणार नाही, हे लक्षात आल्यानेच हा बदल झाला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तरुणांची मते अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. आतापर्यंत युवावर्ग राजकारण व निवडणुकीत मतदानापासून अलिप्त राहतो,
असा अनुभव येत होता. परंतु काळाच्या ओघात, याच वर्गात मतदानाबाबत असलेली उत्सुकता पाहता तरुणांची व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांनी वायफायच्या मुद्द्याला पसंती दिली आहे. आपण
आमदार झालो, तर एखाद्या शाळा-कॉलेजाचा परिसरच नाही, तर चक्क संपूर्ण मतदारसंघात वायफाय पुरवण्याचे आश्वासन अनेक उमेदवार देत आहेत.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांशी निगडित मुद्द्यांवर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून यशही मिळवून दाखवले. परंतु, आता मात्र तरुणवर्ग जागा झाल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे.
सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा आक्रमक आधार तर घेतला आहेच, शिवाय प्रचाराचे मुद्देही कमालीचे बदलले आहेत. त्यामुळे आता काळ बदलला तशा निवडणुकीनींही कात टाकायला सुरुवात केली आहे, त्याचीच ही प्रचिती असावी. (प्रतिनिधी)