उमेदवार जोरात प्रचार‘रथ’ सुसाट
By Admin | Updated: February 17, 2017 02:29 IST2017-02-17T02:29:35+5:302017-02-17T02:29:35+5:30
महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे ४ दिवस शिल्लक आहेत. कमी वेळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी

उमेदवार जोरात प्रचार‘रथ’ सुसाट
महेश चेमटे / मुंबई
महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी शेवटचे ४ दिवस शिल्लक आहेत. कमी वेळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचार रथांवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रचार रथांमध्ये केवळ पक्षश्रेष्ठींच्या छायाचित्रांचा वापर केलेला नसून, डिजिटल पद्धतीने रथ बनविल्याचे दिसत आहे.
राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांनुरूप रिक्षा, तीनचाकी वाहन, जीप वा तत्सम सोईस्कर वाहनांचे रूपांतर प्रचार रथांमध्ये करताना सध्या दिसून येत आहे. गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा एलईडी स्क्रीन लावलेला प्रचार रथ मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे, शिवाय आपला प्रचार रथ इतरांपेक्षा वेगळा दिसावा, यासाठी नवनवीन क्लृप्त्या पक्षांकडून वापरल्या जात आहेत. महापालिकेचा फोटो आणि त्यावर पारदर्शी काच असलेला भारतीय जनता पार्टीचा प्रचार रथ सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे, तर शिवसेनेने पारंपरिक पद्धतीने धनुष्य बाणाची प्रतिकृती असलेले प्रचार रथ बनविले आहेत. राष्ट्रवादीने मात्र, प्रचार रथांवर अधिक भर न देता राष्ट्रवादी घरोघरी हे सूत्र पाळत प्रचार सुरू ठेवला आहे.
प्रचारात उशिरा उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इंजिनच्या प्रतिकृतीचे प्रचार रथ तयार केले आहेत. अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष यांनी आपापली आर्थिक क्षमता ओळखून प्रचार रथ बनविले आहेत. हंगामी कमाईचे साधन म्हणून महाविद्यालयातील तरुण निवडणुकांकडे पाहात आहेत. पक्षांचे प्रचार, वॉररूम, सोशल मीडिया कॅम्पेन, मतदाराभिमुख पोस्टर बनविणे, रथांचे डिझाइन बनविणे अशा विविध राजकीय पक्षांच्या कामांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सध्या पॉकेटमनी मिळत आहे.