Join us  

शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या होणार रद्द; जनगणनेच्या कामासाठी नेमणूक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:27 AM

जनगणना अधिकाऱ्यांनी राज्याच्या काही विभागांतील शिक्षण अधिका-यांना याबाबत नोटीसही पाठविल्या आहेत.

मुंबई : यंदा राज्यातील शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये करण्यात येणाऱ्या १६व्या जनगणनेचा पहिला टप्पा १ मे, २०२० ते १५ जून, २०२० या कालावधीत सुरू होणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत.जनगणना अधिकाऱ्यांनी राज्याच्या काही विभागांतील शिक्षण अधिका-यांना याबाबत नोटीसही पाठविल्या आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निषेध करत, तो मागे घेण्याची मागणीही केली आहे. महापालिका, खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याधापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचना नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत, तसेच मुख्यालय सोडून गेल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.शिक्षकांना वर्षात ७६ सुट्ट्या मिळतात. मात्र, या कामामुळे ७६ पैकी ३९ सुट्ट्यांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या या हक्काच्या सुट्ट्या रद्द होण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जनगणना अधिकाºयांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागतात. आम्ही जनगणना अधिकाºयाची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करू नयेत, अशी मागणी करणार आहोत. अनेकांनी सुट्ट्यांची नियोजन केलेले, तसेच काही शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासण्याची जबाबदारीही असते.- शिवनाथ दराडे, महाराष्ट्र शिक्षक परिषद, कार्यवाह मुंबई.

टॅग्स :शिक्षक