मुंबई विकासाचा आराखडा रद्दीत टाका
By Admin | Updated: March 25, 2015 00:55 IST2015-03-25T00:55:02+5:302015-03-25T00:55:02+5:30
शिवसेना, मनसेपाठोपाठ आता काँग्रेसनेही मुंबईच्या विकास आराखड्याविरोधात भूमिका घेतली आहे़

मुंबई विकासाचा आराखडा रद्दीत टाका
मुंबई : शिवसेना, मनसेपाठोपाठ आता काँग्रेसनेही मुंबईच्या विकास आराखड्याविरोधात भूमिका घेतली आहे़ काँग्रेसच्या वतीने आयोजित परिसंवादात ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी हा विकास आराखडा रद्दीतच टाकावा, अशी स्पष्टोक्ती केली़ विकासक, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांचाही या आराखड्यास विरोध असताना हा आराखडा नेमका कोणासाठी, असा सवालही त्यांनी केला़
सन २०१४-२०३४ मुंबईच्या विकास आराखड्यावर मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात आज परिसंवाद आयोजित करण्यात आला होता़ या बैठकीत विकास आराखड्याचा सर्व उपस्थितांनी विरोध केला़ मुंबईतील ७० टक्के लोक गरीब व मध्यमवर्गीय आहेत़ त्यांनी एक दिवस काम थांबवले तर शहर ठप्प होईल़ परंतु त्यांच्या विकासाकडे या आराखड्यात दुर्लक्ष करण्यात आले असल्याची नाराजी शबाना आझमी यांनी या वेळी व्यक्त केली़ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आराखड्याबाबत जागरूक करून जनआंदोलन सुरू करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले़
विकासाला खीळ
वाढीव एफएसआयवर प्रीमियमही घेतला जाणार असल्याने बांधकामांचा खर्चही वाढणार आहे़ त्यामुळे परवडणारी घरे मिळणे अशक्यच आहे़ याउलट एसआरए, उपकरप्राप्त इमारती, म्हाडाच्या वसाहती व खासगी जमिनीवरील पुनर्विकासाच्या प्रकल्पालाही खीळ बसेल, अशी भीती वास्तुरचनाकार रमेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे़