Join us

आम्हाला मच्छरदाणी तरी देता का? तेलतुंबडेंचा विशेष न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 10:59 IST

आनंद तेलतुंबडेंचा विशेष न्यायालयात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सहआरोपी वर्णन गोन्साल्विस यांना डेंग्यू झाल्यानंतर शहरी नक्षलवाद प्रकरणातील अन्य आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे व सागर गोरखे यांनी तळोजा कारागृहात मच्छरदाणी मिळावी, यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे.

याआधीही तेलतुंबडे यांनी मच्छरदाणी मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना कारागृहाच्या आवारातील तण काढण्याचे व धूरफवारणी करण्याचे निर्देश दिले होते, असे तेलतुंबडे यांनी अर्जात म्हटले आहे. डासांपासून बचाव करणारे मलम किंवा अगरबत्ती प्रभावी नाहीत. त्यामुळे डासांचा त्रास होतो.  आपल्याला असलेल्या आजारांचा उल्लेख करत तेलतुंबडे यांनी आपण मलेरिया किंवा डेंग्यूने आजारी पडू शकतो, अशी भीती अर्जात व्यक्त केली. सागर गोरखे यांनीही मच्छरदाणीची मागणी केली आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने मच्छरदाणी उपलब्ध करण्यास मनाई केली आहे. या मच्छरदाणीचा उपयोग आत्महत्या करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र, गोरखे यांनी कारागृह प्रशासनाच्या युक्तिवादाचे खंडन करत केवळ आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यासाठी अशा प्रकारे कारागृह प्रशासन वागत असल्याचा दावा केला. अतिसुरक्षेत ठेवण्यात आलेले कैदीही मच्छरदाणीचा वापर करत आहेत. केवळ आपलीच मच्छरदाणी हिरावून घेण्यात आली आहे, असे गोरखे याने अर्जात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईन्यायालय