हे असे नव्या वर्षात करता येईल का...?

By अतुल कुलकर्णी | Published: January 1, 2024 12:01 PM2024-01-01T12:01:44+5:302024-01-01T12:03:16+5:30

कॅनडामध्ये क्युबेक नावाचे शहर आहे. इंग्रजी चित्रपटातील दृश्यांप्रमाणे हे शहर. दगडी रस्ते, प्रचंड स्वच्छता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ. त्यावर रंगीबेरंगी खुर्च्या आणि छत्र्या टाकून सजलेली हॉटेल्स.

Can this be done in the new year | हे असे नव्या वर्षात करता येईल का...?

हे असे नव्या वर्षात करता येईल का...?

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

कॅनडामध्ये क्युबेक नावाचे शहर आहे. इंग्रजी चित्रपटातील दृश्यांप्रमाणे हे शहर. दगडी रस्ते, प्रचंड स्वच्छता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ. त्यावर रंगीबेरंगी खुर्च्या आणि छत्र्या टाकून सजलेली हॉटेल्स. शांतपणे आपला आनंद साजरा करत खाणे-पिणे करणारे लोक. प्रत्येक घराच्या खिडकीतून डोकावणाऱ्या रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या... एखाद्या कसलेल्या कलावंताने त्याच्या कल्पनेतले शहर उभे करावे आणि ते चित्र तुमच्यासमोर जिवंत व्हावे, असा तो अनुभव.

टोरांटोमध्ये डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जुन्या-नव्या इमारतींचा अनोखा संगम पाहायला मिळतो. याच भागात एक भला मोठा टॉवर आहे. नव्या बांधकाम शैलीचा अनोखा मिलाप दाखवणाऱ्या त्या टॉवरचे पिलर्स एका शंभर वर्षे जुन्या इमारतीच्या बाजूने गेले, तेव्हा जुने बांधकाम तसेच ठेवून नवे बांधकाम केले गेले. हा आमचा ठेवा आहे. जो आम्ही जपून ठेवला आहे, असे उत्तर तिथले लोक त्यासाठी देतात.

ग्रीसमध्ये डॉक्टर, स्थानिक धर्मगुरू, विद्यार्थी, पालक, स्त्री, पुरुष प्रत्येक जण महिन्यातल्या ठरावीक दिवशी तिथल्या प्रमुख रस्त्यावर जमतात. आपापल्या घरून आणलेला झाडू-पोछा घेऊन तिथले सार्वजनिक रस्ते स्वतः स्वच्छ करतात. काम झाले, की तिथे उभे असलेले पोलिस त्यांना पाण्याची एक बाटली देऊन धन्यवाद म्हणतात. आपले शहर पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, तेव्हा शहर आणि शहरातले रस्ते स्वच्छ राहिले पाहिजेत, ही जाणीव केवळ तिथल्या सरकारमध्ये नाही, तर लोकांमध्येदेखील अशा पद्धतीने रुजलेली आहे.

सॅक्सोफोनचा जनक अडॉल्फ सॅक्स यांचा जन्म बेल्जियममधील डिनांट नावाच्या गावातला. त्यांची आठवण कायम राहावी, म्हणून या गावाने असंख्य सॅक्सोफोन लावले. छोट्या आकारापासून ते दहा-वीस फूट उंचीपर्यंतचे सॅक्सोफोन पाहायला जगभरातील लोक या गावात आवर्जून जातात.
दुबईत रस्त्याच्या दुतर्फा निसर्गाची उधळण दिसते. उन्हाळ्यात दुबईचे तापमान ५० डिग्रीपर्यंत गेले, तरीही रस्त्याच्या कडेला लावलेली फुलझाडे किंवा गवत वाळून जात नाही, अशा पद्धतीने कायमस्वरूपी पाणी देण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे. अशा गवतांच्या गालिचांवर मुक्तपणे पक्ष्यांचे थवे येऊन बसतात.

अबु धाबीला दिवंगत राष्ट्रपती शेख जायद बिन सुलतान अल नहयान यांनी १९९४ मध्ये भव्य मशीद उभारण्याचे काम सुरू केले. ३० एकरपेक्षा मोठ्या जागेमध्ये ही मशीद आहे. शेख जायद ग्रँड मशीद या नावाने ती ओळखली जाते. हिच्या संपूर्ण परिसरात कुठेही तुम्हाला पानाची किंवा चहाची एकही टपरी दिसणार नाही. सर्वत्र सुंदर पानाफुलांची आकर्षक रचना दिसेल.

चरस, गांजा ओढणाऱ्यांचा देश अशी कधी काळी सिंगापूरची ओळख होती. त्या देशाने कात टाकली आणि अतिशय देखणे सिंगापूर उभे राहिले. त्या ठिकाणी पार्किंगच्या जागेत गाडी लावताना दोन-चार इंच जरी गाडी मार्क करून दिलेल्या पार्किंगच्या बाहेर लागली तर थेट गाडी पार्क करणाऱ्याच्या खात्यातून दंडाचे पैसे वसूल होतात. रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून जबर आर्थिक दंड वसूल केला जातो.

जगात अनेक ठिकाणच्या रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या घरांवर, दुकानांवर, मोठमोठ्या भिंतीवर, छोट्या बाकड्यांवर, असंख्य चित्रे काढलेली दिसतात. काही भागात तर रस्त्यांवरही चित्रे काढलेली दिसतात. लोक ती पाहायला आवर्जून जातात. तेव्हा तिथे असणारी सर्व प्रकारची दुकाने भरभरून चालतात. तिथली वाहतूक व्यवस्था बहरते. तिथे गेल्यानंतर लोक आठवण म्हणून काही ना काही घेऊन येतात. संपूर्ण परिसराला त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते. त्या-त्या ठिकाणची सरकारे त्यासाठी प्रोत्साहन देतात, कारण त्यांना त्यातून कररूपाने पैसा मिळतो.

तुम्ही म्हणाल, आज ही विविध ठिकाणची उदाहरणे कशासाठी? आज काहीही नकारात्मक सूर लावायचा नाही हे ठरवून ही काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणांची आम्ही आमच्या आजूबाजूचा परिसर, आमच्या आसपास वावरणारे लोक यांच्याशी तुलना करून बघू. आम्ही सार्वजनिक ठिकाणी गाड्या कशा लावतो? पान खाऊन सरकारी भिंती कशा रंगवतो? कुठेही कसाही कचरा कसे टाकतो? आम्हाला काय, सरकार बघून घेईल असे म्हणत किती बेफिकिरीने वागतो..? या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्याला स्वतःला द्यायची आहेत. सगळ्याच गोष्टी सरकार करेल, तर मग आमची काही भूमिका 
आहे की नाही..? आम्ही हे कोणाला विचारायला हवे? नव्या वर्षाचा संकल्प सोडताना, नव्या वर्षाचे स्वागत करताना आम्ही आमच्यात काही बदल घडवून आणणार आहोत का? हे आपण आपल्या मनाला विचारावे... आणि येणाऱ्या उत्तरानुसार कसे वागायचे ते ठरवावे. आपल्याला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!
 

Web Title: Can this be done in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.