कॅम्पसमध्ये रंगला ‘कलेचा जागर’
By Admin | Updated: November 30, 2015 02:47 IST2015-11-30T02:47:04+5:302015-11-30T02:47:04+5:30
रविवारच्या सुट्टीचा दिवस, कॅम्पसच्या मोकळ््या आवारात कॅनव्हास अन् कुंचला आणि वातावरणाचा उत्साह वाढविण्यासाठी संगीताची जोड.

कॅम्पसमध्ये रंगला ‘कलेचा जागर’
मुंबई : रविवारच्या सुट्टीचा दिवस, कॅम्पसच्या मोकळ््या आवारात कॅनव्हास अन् कुंचला आणि वातावरणाचा उत्साह वाढविण्यासाठी संगीताची जोड...या आल्हाददायक वातावरणात जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या कॅम्पसमध्ये ‘कलेचा जागर’ हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील नवोदित पिढीला नवनव्या गोष्टींचा अनुभव घेता आला.
बॉम्बे आर्ट सोसायटी आणि सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक कला उपक्रम राबविण्यात आला. सुमारे ४० कलाकारांनी सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या प्रांगणात कला प्रात्यक्षिके रसिकांसमोर सादर केली. सामान्यत: कलारसिकांना चित्रकार किंवा शिल्पकार यांनी साकार केलेली कलाकृती ती पूर्ण झाल्यावर पाहायला मिळते, चित्रकला किंवा शिल्पकला ही सादर करण्याचीही कला आहे आणि ती साकार होत असताना पाहण्यात जो आनंद असतो, तो रसिकांना लाभावा, असा या मागील उद्देश आहे. या उपक्रमात उदयोन्मुख, तसेच प्रथितयश कलाकारांनी भाग घेतला.
या उपक्रमात प्रोर्ट्रेट, निसर्गचित्रे, शिल्पकला, मातीकाम आणि आर्ट अॅण्ड क्राफ्ट असे अनेक कलाप्रकार साकार करण्यात आले. पोर्ट्रेट सादर करणाऱ्या कलाकारात अब्दुल गफार, गणेश हिरे, केशव मोरे, मंजिरी मोरे, मनोज सकाळे, मुक्ता अनिल अवचट, प्रमोद कुर्लेकर, सुरेश आवारी, सत्यजीत वरेकर आणि विजय आचरेकर यांचा समावेश होता, तसेच यावेळी कलाकुसर आणि मातीची भांडी यांचे विशेष प्रात्यक्षिक दिनेश कुरेकर, प्रकाश राजेशिर्के, राजेंद्र गोळे, प्रा. विवेक दास, संदीप मंचेकर हे कलाकार दाखविले. या कार्यक्रमाविषयी बोलताना बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत म्हणाले की, ‘कलाकृतीची साकार होताना पाहणे हे कलाकार आणि कलारसिक या दोघांमधील नाते अधिक घट्ट करते. या कार्यक्रमामुळे कलारसिकांना थेट कलाकारांशी संवाद साधून, कलाकृतीची
निर्मिती प्रक्रिया अनुभवण्याची संधी मिळाली.’ (प्रतिनिधी)