आचारसंहितेपूर्वीच प्रचाराचा धडाका
By Admin | Updated: March 16, 2015 01:49 IST2015-03-16T01:49:04+5:302015-03-16T01:49:04+5:30
या आठवड्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत

आचारसंहितेपूर्वीच प्रचाराचा धडाका
नवी मुंबई : या आठवड्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला गती आली आहे. असे असले तरी उमेदवारी निश्चित असलेल्या अनेकांनी आतापासूनच प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. रविवारचा मुहूर्त साधून आज अनेक उमेदवारांनी आपल्या प्रभागात फेरी मारून मतदारांशी संवाद साधला.
बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महापालिकेची ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे विस्कळीत झालेल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रभागांत विविध कार्यक्रम आयोजित करून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवारांकडून केला जात आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरूळ, सानपाडा या भागांतील विविध पक्षांच्या संभाव्य व इच्छुक उमेदवारांनी आज प्रभागात फेरफटका मारून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)