बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम
By Admin | Updated: December 26, 2014 23:06 IST2014-12-26T23:06:00+5:302014-12-26T23:06:00+5:30
पालघर तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे तहसिलदाराकडून तोडण्याची मोहिम जोरात सुरू

बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम
पालघर : पालघर तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे तहसिलदाराकडून तोडण्याची मोहिम जोरात सुरू असली तरी कालांतराने त्याच जागावर पुन्हा बांधकामे उभी केली जात असल्याने महसूल प्रशासनाचा वचक कमी होत चालला आहे काय? अशी विचारणा सर्वसामान्यांमधून होऊ लागली आहे.
पालघरचे तहसिलदार चंद्रसेन पवार यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांनी देवखोप, चिंतूपाडा, सावरेपाडा येथील आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेल्या चाळीच्या बांधकामावर बुलडोझर फिरविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आदिवासींच्या गरीबीचा, अज्ञानाचा फायदा घेत त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी तुटपुंज्या दराने हडपल्या जात आहेत. त्यांच्या जमिनीवर खोटे दस्तावेज बनवून छोट्या खोल्यांचे रुम बांधून ते कारखान्यातील कामगार, छोट्या व्यावसायिकांना विक्री केली जात आहे. पै-पै जमा करून विकत घेतलेली आपली घरे डोळ्यादेखत उध्वस्त होत असल्याने या परप्रांतीय कुटुंबापुढे पर्यायच नसल्याने ते हतबल आहेत.
माहिम ग्रामपंचायत हद्दीतील सावरेपाडा येथील एका आदिवासीची सर्व्हे नं. ४४७/३ मध्ये जमीन असून पालघर मधील मुन्ना यादव नामक जमीन दलालाने वरील आदिवासींच्या कुटुंबाना पैशाचे आमिष दाखवून त्या जमीनीवर महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता २८० बेकायदेशीर चाळी उभारण्याचे कामे हाती घेतले होते. या बांधकामाला माहिम ग्रा. प. च्या एका माजी सरपंचाने बोगस ना-हरकत दाखला दिला होता. या संदर्भात माहिमचे सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनी तहसिलदाराकडे तक्रार दाखल केल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी महसूल प्रशासनाने वरील जागेवरील बेकायदेशीर बांधकामे उध्वस्त केली होती. परंतु महसूल विभागाची पाठ फिरल्यानंतर पुन्ळा त्या जागेवर बांधकामे उभारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात तहसिलदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते तोडण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.