कॅम्पा कोलावासी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: August 5, 2014 03:42 IST2014-08-05T03:42:32+5:302014-08-05T03:42:32+5:30
घरांबाबत पालिका आणि राज्य शासन मार्ग काढू शकत नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारल्याने कॅम्पा कोलावासीयांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

कॅम्पा कोलावासी मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील अनधिकृत घरांबाबत पालिका आणि राज्य शासन मार्ग काढू शकत नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारल्याने कॅम्पा कोलावासीयांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
याबाबत लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया कॅम्पा कोला कम्पाउंडच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, ‘अनधिकृत मजल्यांवरील घरांचे वीज, पाणी आणि गॅसजोडणी तोडण्यास आलेल्या पालिका प्रशासनाला विरोध करताना कारवाईत अडथळा निर्माण न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. शिवाय पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण सांगत तोडगा काढण्यास नकार देत होते. आता न्यायालयानेच त्यांना तोडगा का काढता येत नाही, असा सवाल करीत रहिवाशांची बाजू भक्कम केली आहे.
पालिकेच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्याची प्रतीक्षा करणार असल्याचे रहिवाशाने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी कायद्याच्या चौकटीत बसून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा रहिवाशांचा विचार आहे. (प्रतिनिधी)