यालाच म्हणतात, पारदर्शक कारवाई! वृत्तपत्र विक्रेत्यांचा बळी : फेरीवाल्यांना मात्र अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:30 IST2017-10-09T02:30:30+5:302017-10-09T02:30:43+5:30
एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने संयुक्तपणे मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगतच्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली.

यालाच म्हणतात, पारदर्शक कारवाई! वृत्तपत्र विक्रेत्यांचा बळी : फेरीवाल्यांना मात्र अभय
मुंबई : एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने संयुक्तपणे मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगतच्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईत रेल्वे स्थानकांलगतच्या वृृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलचा बळी प्रशासनाने घेतला असून फेरीवाल्यांना मात्र अभय दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे हीच का प्रशासनाची पारदर्शक कारवाई, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ लोकांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चर्चगेट येथे काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर रेल्वे प्रशासनाने १५ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासित केले होते. त्याप्रमाणे रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने शनिवारी दादरसह विविध रेल्वे स्थानक परिसरांत कारवाईचा बडगा उचलला. मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत रेल्वेने केलेल्या थातूरमातूर कारवाईनंतर फेरीवाल्यांनी पुन्हा या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.
प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाºयांमुळेच कारवाईच्या काही काळ आधीच फेरीवाल्यांना कारवाईची माहिती मिळते. त्यामुळे भ्रष्टाचार दूर होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया किशोर वायकर या प्रवाशाने व्यक्त केली.
दरम्यान, महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर केलेल्या कारवाईचा वृत्तपत्र विक्रेता संघाने विरोध केला आहे. काही अधिकारी विनाकारण विक्रेत्यांना त्रास देत असल्याचे संघाचे म्हणणे आहे. वृत्तपत्र विक्रेते हे फेरीवाले नसून समाजप्रबोधनाचे काम करणारे ज्ञानदूत आहेत.
तरीही अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना काही अधिकारी वृत्तपत्र विक्रेत्यांवर सूड उगवत आहेत, अशी माहिती संघाचे कार्याध्यक्ष संजय चौकेकर यांनी निवेदनातून दिली आहे.