Join us  

मोदी सरकारविरोधात भारतीय किसान सभेची जेलभरोची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 2:56 AM

‘नरेंद्र मोदी सरकार चले जाव’ अशा शब्दांत सीआयटीयू, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियनने भारतीय ट्रेड युनियन केंद्र संघटनेच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्टला देशव्यापी जेलभरोची हाक दिली आहे.

मुंबई : ‘नरेंद्र मोदी सरकार चले जाव’ अशा शब्दांत सीआयटीयू, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियनने भारतीय ट्रेड युनियन केंद्र संघटनेच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्टला देशव्यापी जेलभरोची हाक दिली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानक ते हुतात्मा चौकापर्यंत मोर्चा काढून लाखो आंदोलक जेलभरो करतील, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस पी.एम. वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.संघटनेने सांगितले की, या आंदोलनात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, बांधकाम कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, घर कामगार असे श्रमिक, छोटे उद्योजक, व्यापारी, दलित आदिवासी, अल्पसंख्याक सामील होतील. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारची धोरणे देशविघातक आहेत. ती बदलण्याची मागणी करत सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन केले जाईल.वाढती महागाई, बेरोजगारी, उत्पन्नात घट झाल्याने तरुण त्रस्त आहेत. श्रम कायद्यात कामगारविरोधी बदल केल्याने कामगार वर्गाची वाताहत होऊ लागली आहे, तर फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करताना कष्टाने जीवन जगणाऱ्या हजारो फेरीवाल्यांचा धंदा उद्ध्वस्त केला जात आहे. एकीकडे लोककल्याण योजनांच्या निधीत कपात केली जात आहे, तर दुसरीकडे देशी-विदेशी भांडवलदारांना प्रचंड सवलती दिल्या जात आहेत. म्हणूनच देशात १ ते १५ लाख लोक या आंदोलनात सामील होऊन क्रांती दिनी ‘भाजपा चले जाव’चा नारा देणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

टॅग्स :किसान सभा लाँग मार्च