मुंबई : सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी, १४ ऑगस्टला या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून वाहनांची लवकरच सुटका होणार आहे.
एमएमआरडीएने एससीएलआरचा सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात केबल स्टेड पूल उभारला आहे. तो ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून २१५ मीटर लांबीचा आहे.
हा पूल जमिनीपासून २५ मीटर उंचीवर असून देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे. या पुलाचे काम गेल्या महिन्यातच पूर्ण झाले होते. मात्र उद्घाटन लांबणीवर पडले होते. अखेर गुरुवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
दरम्यान, एमएमआरडीएने एससीएलआर प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये हाती घेतले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार २०१९ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कंत्राटदाराने केलेल्या दिरंगाईने कामाला विलंब झाला होता. त्यातून एमएमआरडीएने कंत्राटदाराला दंड लावला होता. तसेच अभियांत्रिकी दृष्टीने या पुलाचे काम किचकट असल्याने त्याला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली होती.
या प्रकल्पांचेही लोकार्पण
धारावीतील टी जंक्शन येथून वांद्रे वरळी सी लिंक आणि माहीमकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारलेली ३१० मीटर लांबीची मार्गिका.
मंडाळे डेपो येथील मेट्रोच्या प्रशिक्षण इमारती मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी मालवणी येथे उभारलेली इमारती
आयकॉनिक पूल
एससीएलआर रस्त्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारलेला ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील केबल स्टेड पूल आहे. अभियांत्रिकी स्वरूपात हे काम काहीसे किचकट होते. विशिष्ट प्रकारच्या केबल आणि तीव्र वळण यांमुळे हा पूल आयकॉनिक स्वरूपाचा ठरेल.
प्रकल्पाचे फायदे
पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक कुर्ला ते विमानतळ सिग्नलविरहित वाहतूक वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार.