Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या जिवापेक्षा ‘केबल’ महत्त्वाची, रेल्वेकडून परवानगी फाइल्सचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 05:12 IST

रेल्वे रुळांखालून केबल्स टाकण्याच्या प्रक्रियेला खर्च जास्त येत असल्याने, पादचारी पुलाच्या आतून केबल्स टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. अंधेरी गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सुमारे ६२ केबल्स अधांतरी लटकत असल्याचे निर्दशनास आले आले होते.

- महेश चेमटेमुंबई : रेल्वे रुळांखालून केबल्स टाकण्याच्या प्रक्रियेला खर्च जास्त येत असल्याने, पादचारी पुलाच्या आतून केबल्स टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. अंधेरी गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सुमारे ६२ केबल्स अधांतरी लटकत असल्याचे निर्दशनास आले आले होते.रेल्वे रुळाखालून केबल्स टाकण्याची यंत्रणा आहे. रेल्वे रुळाखालील जमिनीमध्ये ‘मायक्रोटनेल’ (लहान भुयार करून) करून त्यातून केबल्स टाकण्याचे काम करता येते. मुंबई उपनगरीय लोकलच्या काही टप्प्यांमध्ये या पद्धतीने केबल्स टाकण्यात आल्या आहेत. मात्र, याला खर्च अधिक येतो. त्याचबरोबर संबंधित रेल्वे प्रशासनाची परवानगीदेखील आवश्यक असते. या खर्चाच्या तुलनेत पादचारी पुलामध्ये ड्रिल करून केबल्स टाकण्याच्या प्रक्रियेला कमी खर्च येतो. ड्रिल केल्यानंतर अशास्त्रीय पद्धतीने पेव्हर ब्लॉकचा वापर केल्यामुळे पुलाचा भार वाढतो, तसेच ड्रिल केल्यामुळे पावसाचे पाणी झिरपून पुलाचे बांधकामदेखील कमकुवत होते. मात्र, या प्रक्रियेसाठीही संबंधित प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्याचबरोबर, त्याचे सेवा शुल्कदेखील भरावे लागते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हे सेवा शुल्क संबंधित कंपनीने भरले होते की नाही, हे चौकशीअंती उजेडात येइल. याचा अर्थ, मुंबईकरांच्या जिवापेक्षा केबलचा खर्च कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आल्याची खंत मुंबईकरांमध्ये आहे.अंधेरीतील गोखले पुलामधील केबल्सच्या फाइलची शोधाशोध सध्या सुरू आहे. ६२ केबल्सपैकी रेल्वे प्रशासनाची किती केबल्सला परवानगी आहे, याचा शोध घेण्यात येईल. त्यानुसार, दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गोखले पुलामध्ये अग्रगण्य इंटरनेट कंपनी, नामांकित विद्युत वाहिनी, प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी यांच्या केबल्स असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. फाइलअंती सर्व माहिती समोर येईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.त्या वेळी हटविल्या ४५ केबल्सदीड वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानक परिसरातील अति उच्च दाबाची केबल ओव्हरहेड वायरवर कोसळली होती. यामुळे शॉटसर्किट होऊन पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. या अपघातानंतर चर्चगेट-विरार परिसरातील रेल्वे रुळांवरील तब्बल ४५ पेक्षा जास्त केबल्स हटविण्यात आल्या होत्या.

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटना