Join us  

व्होट बँकेच्या राजकारणासाठी सीएएला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 5:35 AM

जे. पी. नड्डांची विरोधकांवर टीका : नवी मुंबईतील भाजपच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

नवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशहिताचा आहे. विरोधक व्होट बँकेच्या राजकारणासाठी आंदोलन करत आहेत. देशवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप देशासाठी काम करतो, व्होट बँकेसाठी काम करत नाही, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबईतल्या नेरुळमधील रामभाऊ कापसे नगरीमध्ये झालेल्या या अधिवेशनाला राज्यभरातून आठ हजारांपेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांच्या वचनपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पक्षाचे नेते अ‍ॅड. अशिष शेलार यांनी हा प्रस्ताव मांडला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काश्मीरमधून ३७० कलम रद्द केले. सीएएचा निर्णय घेण्यात आला. तीन तलाक बंदीचा कायदा केला, राममंदिर बनविण्यासाठी न्यासाची स्थापना झाली. यासाठी पंतप्रधानाचे अभिनंदन करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे. काँगे्रस व इतर पक्ष देशवासीयांची दिशाभूल करत आहेत. मुस्लीम बांधवांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे मतही त्यांनी या वेळी मांडले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. काश्मीरमध्ये आंतकवाद्यांना व फुटीरवाद्यांना बळ मिळत होते. ३७० कलम हा भावनिक मुद्दा बनवून ठेवला होता. हे कलम रद्द केल्यामुळे आता काश्मिरी जनता विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे. देशातील कायदे तेथेही लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीएएचे आंदोलन म्हणजे व्होट बँक जपण्याचे राजकारण असल्याचेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले. सीएएविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. सीएएमुळे देशातील आदिवासी, भटके विमुक्तांनाही त्रास होणार असल्याचे भासविले जात आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्यांना आव्हान देतो त्यांनी समोर येऊन आदिवासी व भटक्या विमुक्तांना कसा त्रास होईल ते सांगावे.३७० कलम रद्द केल्यामुळे कश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे बोलले जात होते; परंतु प्रत्यक्षात तेथे विकासाची पहाट झाली आहे. आंदोलनाच्या नावाखाली देशात दुफळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचे व अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांनी वस्तुनिष्ठ माहिती जनतेसमोर पोहोचवावी, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.सोशल मीडियाचा प्रभावी वापर कराकेंद्र सरकारने घेतलेल्या सीएए, ३७० कलम, राम मंदिर न्यास व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेमध्ये घेऊन जाण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. विरोधात भूमिका मांडणाºया योग्यपद्धतीने उत्तर द्यावे, असे आवाहनही अधिवेशनामध्ये पदाधिकाºयांना करण्यात आले. राज्यातील ठाकरे सरकारविरोधात लढा उभारतानाही सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याच्या सूचना या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्या. 

टॅग्स :भाजपानागरिकत्व सुधारणा विधेयकदेवेंद्र फडणवीस