Join us

Byculla Bridge Update: भायखळा पूल पुन्हा रखडला! बांधकाम ७२ टक्के पूर्ण : ऑक्टोबरऐवजी आता मे २०२६ ची ‘डेडलाइन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:17 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भायखळा पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल-एआरआयडीसी) सुरू असून, आतापर्यंत या पुलाचे ७२ टक्के काम झाले आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करणे अपेक्षित होते. मात्र, नियोजन कोलमडल्याने याला आणखी पाच महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून तो खुला करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची तपासणी करण्यात आली.  भायखळा येथील उड्डाणपुलाचे आयुर्मान संपल्याने नवीन पूल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. ‘महारेल-एआरआयडीसी’ने डिसेंबर २०२१ पासून या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. हा पूल वांद्रे सागरी सेतूप्रमाणे केबल स्टेड आधारित आहे. या पुलाच्या चार मार्गिका असतील. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहील. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

भायखळा पूर्व-पश्चिम या उड्डाणपुलाने जोडणार सीएसएमटी येथून जे.जे. उड्डाणपूलमार्गे भायखळ्यापर्यंतचा प्रवास जलदगतीने होतो. मात्र, पुढे मोहम्मद अली रोड आणि मुंबई सेंट्रल, नागपाड्यातून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे भायखळा सिग्नल, रेल्वे स्थानक परिसर, तसेच पूर्वेला अग्निशमन दल मुख्यालय, बकरी अड्डा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी भायखळा पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.या पुलावर अत्याधुनिक सजावटीसाठी एलईडी विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुलाच्या आकर्षणात भर पडेल. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष तिरंगी प्रकाशयोजना करण्यात येईल. या पुलावर सेल्फी पाॅइंट्स असणार आहेत. 

तिसरी डेडलाइन : ऑक्टोबर २०२५ 

भायखळा उड्डाणपुलाच्या कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२३ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कासवगतीने पुलाचे काम सुरू असल्याने उड्डाणपुलाची डेडलाइन कालावधी जुलै २०२४ निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून ऑक्टोबर २०२५ करण्यात आली. त्यानंतरही उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Byculla Bridge Delayed Again! Construction 72% Complete; New Deadline May 2026

Web Summary : The Byculla bridge reconstruction, 72% complete, faces further delays. Originally slated for October 2025, it's now expected to open in May 2026. The bridge aims to ease traffic congestion with advanced lighting and selfie spots.
टॅग्स :मुंबई