Join us

'बोगस डॉक्टर' व्याधीवर क्यूआर कोडचा जालीम उतारा; वैद्यकीय परिषदेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:37 IST

कोड स्कॅन करा, बनावट डॉक्टर ओळखा

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून गुरुवारी संध्याकाळी राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना मेल करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांना दिलेल्या लिंकवरून 'क्यूआर कोड' डाऊनलोड करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना तो 'क्यूआर कोड' त्यांच्या क्लिनिकमध्ये नावाच्या पाटी समोर लावावा लागणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केला की डॉक्टर खरा की बोगस, हे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लगेच कळू शकणार आहे. बोगस डॉक्टरांच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. सर्वसामान्यांना बोगस डॉक्टर ओळखणे अवघड असते. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते. मात्र, तरीही बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येतच असतात. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतर्फे 'आपल्या डॉक्टरला ओळखा' हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

डॉक्टरांची माहिती, शिक्षण 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला क्यूआर कोड दिला गेला आहे. त्यामध्ये सर्व डॉक्टरांची माहिती व शिक्षण उपलब्ध असेल. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कौन्सिलचे काम सुरू होते अखेर ते काम पूर्ण झाले आहे. १ लाख २० हजारांहून अधिक डॉक्टर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य आहेत. डॉक्टरांच्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आणि त्यांची सर्व माहिती ठेवण्याचे काम परिषद करते.

आपण ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहोत, त्याची संपूर्ण माहिती रुग्णांना असायला हवी. या क्यूआर कोडमुळे रुग्णाला आपण कोणत्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहोत याची माहिती मिळेल तसेच संबंधित डॉक्टरांचा परवाना नूतनीकरण झाला आहे का ते कळणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना मेल पाठविण्यात आले आहे. क्यूआर कोडमुळे बोगस डॉक्टरांना आळा घालणे सहज शक्य होणार आहे. -डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, वैद्यकीय परिषद

टॅग्स :मुंबईडॉक्टरवैद्यकीय