Join us  

सायबर हॅकरने लुटले कंपनीचे २१.५९ लाख; पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:42 AM

बीकेसीतील भारत डायमंड बोर्समध्ये असलेल्या एका कंपनीची बँक खाती हॅक करून सायबर लुटारूंनी २१ लाख ५९ हजार रुपयांवर डल्ला मारला.

मुंबई : बीकेसीतील भारत डायमंड बोर्समध्ये असलेल्या एका कंपनीची बँक खाती हॅक करून सायबर लुटारूंनी २१ लाख ५९ हजार रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कंपनीची सारस्वत बँकेच्या बीकेसी येथील शाखेत चालू बँक खाती आहेत. 

९ जानेवारीच्या सकाळी तक्रारदार यांच्या सहकाऱ्याने बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी ऑनलाइन लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. लॉगिन होत नसल्याने त्याने बँकेशी संपर्क करून माहिती घेतली असता बँक खात्यातून रक्कम गेल्याचे त्याला समजले.  कंपनीच्या बँक खात्यातून ६ आणि ७ जानेवारीला आरटीजीएसच्या माध्यमातून पाच व्यवहार करत १५ लाख काढण्यात आले होते. तक्रारदार यांनी लगेचच बँक लॉगिन पासवर्ड बदलून बँक खाते पुन्हा तपासले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या बँक खात्यात लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, पासवर्ड चुकीचा असल्याचे दिसू लागल्याने तक्रारदार यांनी या बँक खात्याचा लॉगिन, पासवर्ड बदलला. या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून एक लाख ५९ हजार रुपये गेले. तक्रारदारांनी बँकेत कॉल करून बँक खाती फ्रीझ करण्यास सांगितली. त्यानंतरही एका खात्यातून पाच लाख रुपये काढले. कंपनीच्या दोन्ही बँक खात्यांच्या ऑनलाइन बँकिंग सुविधांमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करून सायबर लुटारूने २१ लाख ५९ हजार रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :मुंबईसायबर क्राइमधोकेबाजीपोलिस