सर्वाधिक व्यस्त आणि कमाईचे स्थानक
By Admin | Updated: July 28, 2014 01:49 IST2014-07-28T01:49:12+5:302014-07-28T01:49:12+5:30
तशीच लांबी, तसेच प्रवासी आणि परिसरही सारखाच. पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर आणि मध्य रेल्वेच्या डोेंबिवलीत बरीच समानता आहे.

सर्वाधिक व्यस्त आणि कमाईचे स्थानक
सुशांत मोरे, मुंबई
तशीच लांबी, तसेच प्रवासी आणि परिसरही सारखाच. पश्चिम रेल्वेच्या भार्इंदर आणि मध्य रेल्वेच्या डोेंबिवलीत बरीच समानता आहे. दोन्ही स्थानकांना बरीच आंदोलने आणि बलिदानानंतर टर्मिनस मिळाले आहे. मात्र भार्इंदरचे रुपडे आता बरेच पालटले आहे.
फेब्रुवारी १९८५ आणि आॅक्टोबर १९९४ रोजी भार्इंदरमध्ये रेल्वे समस्यांबाबत मोठी आंदोलने झाली आहेत. आग लावणे, लाठी चार्ज, त्याचप्रमाणे गोळीबारही झालेला असून रेल्वे संपत्तीचे नुकसान होण्याबरोबरच काहींचे प्राणही गेले आहेत.
इतिहासकार टोलोमीने वसई खाडीला ‘बिंदा’ नावाची ओळख दिली. ते भार्इंदर आहे. एकेकाळचे बंदर. १८७0 मध्ये इंग्रजांनी घोडबंदर, भार्इंदर आणि मीरा रोडला ९९९ वर्षांच्या लीजवर मुंबईच्या रामचंद्र लक्ष्मणजीला दिले. कारण भार्इंदरमध्ये सारखा पूर येत होता आणि स्थानिकांनी काही तटबंदीची डागडुजी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे इंग्रजांनी हा निर्णय घेतला होता.
पूर्वेला उद्योग आणि पश्चिम दिशेला रहिवासी गाव राहिलेले भार्इंदर अनियोजित विकास आणि बिल्डरांच्या भाऊगर्दीमुळे काँक्रीटचे जंगल बनले आहे. १८७२-७३ मध्ये जेव्हा रेल्वे स्टेशन सुरू झाले. तेव्हा प्रवाशांची संख्या ३३ हजार ४५५ होती. १८८0 मध्ये ती वाढून ४७ हजार २२६ एवढी झाली. याच काळात मालवाहतूक २६२७ टन वाढून १९ हजार ७७0 टनांपर्यंत गेली. त्यामुळेच आज पश्चिम रेल्वेवरील भार्इंदर हे सगळ्यात व्यस्त स्थानक गणले जाते आणि कदाचित सर्वाधिक कमाई करणारे स्थानकही.