दिघ्यात जळीतकांड
By Admin | Updated: December 20, 2014 01:19 IST2014-12-20T01:19:04+5:302014-12-20T01:19:04+5:30
दिघा परिसरातील गणपतीपाडामध्ये जवळपास एक महिन्यापासून समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री घराबाहेर उभी केलेली वाहने

दिघ्यात जळीतकांड
नवी मुंबई : दिघा परिसरातील गणपतीपाडामध्ये जवळपास एक महिन्यापासून समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री घराबाहेर उभी केलेली वाहने जाळली जात आहेत. आतापर्यंत १३ वाहने जाळण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
वाहने जाळणाऱ्या टोळीमुळे गणपतीपाडामधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. हे समाजकंटक घराबाहेर व रोडवर उभ्या असणाऱ्या वाहनांना आग लावत आहेत. या आगीमध्ये वाहनांचे पूर्ण नुकसान होत आहे. काही वाहनांना लागलेली आग वेळेत लक्षात आल्यामुळे ती विझविण्यात येते तर काही वाहने पूर्णपणे जळून खाक होत आहेत. महिन्याभरामध्ये ९ मोटारसायकल, ३ रिक्षा व एका चारचाकी वाहनास आग लावण्यात आली आहे. रात्री घराबाहेर उभी केलेली गाडी सकाळपर्यंत सुरक्षित राहील याची खात्री वाटेनासी झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बंदोबस्त वाढवावा, आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु अद्याप पोलिसांकडूनही ठोस कारवाई झालेली नाही. वाहने जाळणाच्या घटना थांबत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे.
आगीमुळे वाहनांचे नुकसान होत असून सांगाडा भंगारामध्ये देण्याची वेळ आली आहे. ज्या तीन रिक्षा जाळल्या त्यांच्या मालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनांना लावलेल्या आगीमुळे पूर्ण झोपडपट्टीला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची मोठी दुर्घटना होवून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात राहणे असुरक्षित वाटू लागले आहे. पोलिसांनी या समाजकंटकांचा बंदोबस्त केला नाही, तर भविष्यात वाहनांना आग लावणारे गुंड रहिवाशांना मारहाण करण्यास व दहशत वाढविण्याचे काम करतील अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची माहिती घेवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)