बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज!

By Admin | Updated: August 25, 2014 02:09 IST2014-08-25T01:48:02+5:302014-08-25T02:09:03+5:30

मुंबापुरीत गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्व गणेशभक्तांना लागली आहे.

Bumba's arrival is ready! | बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज!

बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज!

मुंबई : मुंबापुरीत गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्व गणेशभक्तांना लागली आहे. घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणाऱ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मुंबई शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक पर्वणी असते. या उत्सवासाठी प्रशासन आता सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात सांगितले, की गणेशोत्सवाच्या २ महिन्यांपूर्वीपासून गणेशोत्सव तयारीसाठी महापालिका प्रशासनाकडून आढावा घेऊन नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने ठोस असे उपक्रम राबविण्यात येतात. त्याकरिता लोकप्रतिनिधी, महापालिकेचे पदाधिकारी, गणेशोत्सव समन्वय समिती यांच्याशी चर्चा केली जाते. सर्वांच्या सूचना विचारात घेतल्या जातात. होर्डिंग्ज, रस्तेदुरुस्ती, परवाने आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था महापालिका करीत असते. उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. त्याची एकत्रित पाहणी करण्यात आली असून, काही त्रुटी आढळल्या तर निश्चितच त्यात त्वरेने सुधारणा करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले की, गणरायाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त मुंबई महापालिका ही देशात सर्वाधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देते. या उत्सवात महापालिका प्रतिवर्षी गणेशभक्तांना कसली कमतरता पडू देत नाही. यासाठी अर्थसंकल्पात मुंबईकरांना पुरेशा स्वरूपात नागरी सुविधा देण्यासाठी तरतूदही करते.
या वर्षीही गणरायाच्या उत्सवात अडचणी येणार नाहीत, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर यांनीदेखील महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समितीचा काहीही आक्षेप नाही, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bumba's arrival is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.