मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून हा प्रकल्प २०२८ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-२०२५ मध्ये ते बोलत होते. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदींसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बुलेट ट्रेनचे काम बंद ठेवण्यात आले होते, अडीच वर्षे काम बंद होते. यामुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम पुढे गेले, आपण मागे राहिलो. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, मुंबईत सागरी किनारा रस्ता, अटल सेतू, विविध मेट्रो मार्गांची कामे मार्गी लागली आहेत. या सर्व विकासकामांमुळे मुंबईत गुंतवणूक ५० बिलियन डॉलरपर्यंत जाईल. महाराष्ट्र हे नेहमी भविष्यासाठी ‘रेडी’ असणारे राज्य आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.