Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या डोंगरात बुलेट ट्रेनचा १.५ किमी बोगदा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:04 IST

प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार; रेल्वेमंत्र्यांची ऑनलाइन उपस्थिती

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. पालघर जिल्ह्यातील विरार-बोईसर विभागात असलेला १.५ किमी लांबीच्या बोगद्याचे डोंगरातील खोदकाम पूर्ण झाले.  या प्रदेशातील हा सर्वांत लांब डोंगरी बोगद्यांपैकी एक असून २ जानेवारी २०२६ रोजी हे काम पूर्ण झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाला ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही टोकांपासून ड्रिल-अँड-ब्लास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा उभारण्यात आला आहे. या कामासाठी १८ महिने इतका कालावधी लागला आहे. या तंत्रज्ञानामुळे खडकांच्या परिस्थितीचे रिअल-टाइम निरीक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार शॉटक्रीट, रॉक बोल्ट आणि जाळीदार गर्डरसारख्या सपोर्ट सिस्टिम बसवणे शक्य होत असल्याचे अधिकारी म्हणाले. सध्या या बोगद्याची इतर अंतर्गत आणि बाह्य कामे सुरू असून ५५ टक्के काम पूर्ण झाले. डोंगरातील या खोदकामासह बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाने वेग घेतल्याचेच समोर आले आहे.

२७.४ किमीचे बोगदेप्रकल्पाच्या संपूर्ण ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये  २७.४ किलोमीटरचे बोगदे आहेत, यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगदे आहेत. प्रकल्पात आठ डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी अंदाजे ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते बीकेसी ५ किमी भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता. 

मुंबई-अहमदाबाद प्रवास १ तास ५८ मिनिटांनी कमी बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मिती होत आहे. प्रकल्प  पूर्ण झाल्यावर, मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेळ फक्त १ तास ५८ मिनिटांपर्यंत कमी होईल. यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांच्या अर्थव्यवस्था बळकट होतील. प्रकल्प पूर्ण झाल्यावर, रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन  उत्सर्जन अंदाजे ९५ टक्क्यांनी कमी होईल.अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar Bullet Train Project: 1.5 km Tunnel Excavation Completed

Web Summary : A 1.5 km tunnel excavation in Palghar for the Mumbai-Ahmedabad bullet train project is complete. The project will cut travel time to 1 hour 58 minutes and is expected to boost the economy and reduce carbon emissions.
टॅग्स :पालघर