मुंबई : माहीम येथील लेडी जमशेदजी मार्गावरील मेट्रो ३च्या कामामुळे येथील रेहमान मंझिल, शफी मेन्शन आणि मस्तान मंझिल या इमारतींना हादरे बसत आहेत. शफी मेन्शन इमारतींमध्ये काहींच्या घरांना लहान भेगा पडू लागल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.रेहमत मंझिल ही इमारत १९३७ साली बांधलेली आहे तर शफी मेन्शन ही इमारत रेहमत मंझिलच्याही अगोदर बांधलेली आहे. दोन्ही इमारती ८० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. मेट्रोचे खोदकाम असेच चालू राहिले तर येथे दुर्घटना घडू शकते. त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शफी मेन्शन इमारत तळमजला अधिक चार मजले आणि रेहमत मंझिल ही इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी आहे. या दोन्ही इमारतींध्ये मिळून पन्नासहून अधिक कुटुंबे राहतात. मेट्रोच्या कामामुळे या पन्नास कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. मेट्रोचे कामकाज थांबवावे यासाठी अनेकवेळा विनंती केली तरी काहीच फरक पडला नाही, अशी माहिती रहिवासी असबुद्दिन कुरेशी यांनी दिली.मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पदपथ बंद झाला आहे. ये-जा करण्यासाठी रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे, अशी तक्रारही रहिवाशांनी केली आहे.>मुंबईतील जमीन आणि समुद्राची पातळी समान असल्यामुळे मुंबईत भुयारी मेट्रो चालवणे शक्यच नाही. दिल्लीमधील जमीन समुद्रसपाटीपासून ३०० मीटर उंचीवर आहे. तर टोकयोमधील मेट्रो समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असल्याने तेथे मेट्रो चालवणे शक्य झाले आहे. मुंबईत हे शक्य नाही. सात बेटांपासून आणि समुद्रात भरणी टाकून तयार केलेल्या या शहरात भुयारी मेट्रोचा प्लॅन म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळच आहे.- गुलाम हुसेन, रहिवासीमेट्रोच्या कामामुळे इमारतीला हादरे बसत आहेत. काहींच्या घरांमध्ये भेगा पडल्याचे ऐकायला मिळाले आहे. मेट्रोच्या कामामुळे इमारतीचे काही नुकसान झाले तर त्याची दुरुस्ती करून देऊ, असे मेट्रोचे अधिकारी सांगतात.- मेहर इराणी, रहिवासी
माहीममधील इमारतींना मेट्रोचे हादरे,काही जणांच्या घरांना पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 02:54 IST