इमारतीचा स्लॅब कोसळला
By Admin | Updated: March 15, 2015 22:34 IST2015-03-15T22:34:00+5:302015-03-15T22:34:00+5:30
तालुक्यातील गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन परिसरातील इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना स्लॅब अचानक
इमारतीचा स्लॅब कोसळला
अलिबाग : तालुक्यातील गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन परिसरातील इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना स्लॅब अचानक कोसळल्याने त्याखाली सुमारे १५ कामगार अडकून पडले होते. त्यामध्ये दोन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना अलिबागच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये अनिल राठोड आणि संजू जाधव यांचा समावेश आहे. कामावर संतोष जाधव, भाऊ राठोड, चांदीबाई पवार, शानूबाई, उमेश राठोड यांच्यासह अन्य कामगार होते.
इमारतीचे काम करण्यासाठी अलिबागच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कामगार नाक्यावरील सुमारे १५ कामगारांना कोंबऱ्या शेठ यांनी कामासाठी गोंधळपाडा येथे नेले. सकाळी ११ वाजता स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. सुमारे ९० पोती सिमेंटसह रेती, खडी यांचे मिश्रण करून स्लॅब टाकण्यात आल्याचे तेथे कामावर आलेल्या चांदीबाई पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू असताना स्लॅबवर सुमारे पाच कामगार होते, तर उर्वरित कामगार खाली होते. त्यावेळी तेथे असणाऱ्या सुतार याने स्लॅबला लावलेला शिकंजा (चिमटा) काढला आणि सुमारे एक हजार स्क्वेअर फुटाचा स्लॅब खाली कोसळला. त्यामध्ये १५ माणसे दबली गेली. एकमेकांना सोडवण्यात कामगारांनीच एकमेकांना मदत केली, असे कामगारांनी सांगितले. अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)