बिल्डरांनी थकविले म्हाडाचे ५० कोटी
By Admin | Updated: August 30, 2015 03:09 IST2015-08-30T03:09:21+5:302015-08-30T03:09:21+5:30
सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने भाडेतत्त्वावर

बिल्डरांनी थकविले म्हाडाचे ५० कोटी
- तेजस वाघमारे, मुंबई
सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने भाडेतत्त्वावर संक्रमण शिबिरे उपलब्ध करून दिली आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बिल्डरांनी संक्रमण शिबिराचे तब्बल ५0 कोटींचे भाडे थकविले आहे. म्हाडाकडून भाडे वसुलीची कारवाई ठप्प झाल्याने सुमारे ५0 बिल्डर मोकाट फिरत आहेत.
मुंबईतील जुन्या सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना या संक्रमण शिबिरातील घरे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. त्यानुसार बिल्डरांनी सुमारे १ हजार १२४ घरे म्हाडाकडून घेतली आहेत. या घरांचे तब्बल ५0 कोटी भाडे अनेक वर्षांपासून बिल्डरांनी थकविले आहे. तसेच पुनर्वसन प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही म्हाडाला संक्रमण शिबिराचा ताबा दिलेला नाही.
या बिल्डरांना कारवाईची नोटीस बजावत त्यांच्या इतर ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांवर बंदी घालण्याचा इशारा मंडळाने दिला होता. या कारवाईचा धसका घेत काही बिल्डरांनी म्हाडाला थकीत भाड्याची रक्कम आणि दंडापोटीची रक्कम म्हाडाकडे जमा केली. तर काही बिल्डरांचे बँक खाते सील केले. परंतु या बिल्डरच्या खात्यात १ लाख रुपये असल्याचे समोर आले होते. त्यामुळे म्हाडाची ही कारवाई केवळ दिखावा असल्याची चर्चा म्हाडात रंगली होती. गेल्या काही वर्षांमध्ये बिल्डरांकडून थकीत भाडे वसूल करण्याची कारवाई ठप्प झाली झाल्याने बिल्डर मोकाट फिरत असल्याने कारवाई करण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांनी हलचाल सुरू केली आहे. बिल्डरांनी संक्रमण शिबिराचे भाडे थकविले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लवकरच म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे आर आर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.
म्हाडाची मुंबईत ५६ संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये २० हजार घरे आहेत. मुंबईतील जुन्या सेसप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या बिल्डरांना येथील घरे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. त्यानुसार बिल्डरांनी सुमारे १ हजार १२४ घरे घेतली आहेत. त्यांचे तब्बल ५0 कोटी भाडे बिल्डरांनी थकविले.