पाली-भुतिवली धरणात बिल्डरचे पंप
By Admin | Updated: August 11, 2014 23:20 IST2014-08-11T23:20:54+5:302014-08-11T23:20:54+5:30
पाली-भुतिवली धरणातील पाणी पुन्हा एकदा उचलण्यास पोद्दार बिल्डरने सुरुवात केली आहे. पोद्दार बिल्डरला धरणातून पाणी साठा मंजूर केला आहे.

पाली-भुतिवली धरणात बिल्डरचे पंप
विजय मांडे, कर्जत
पाली-भुतिवली धरणातील पाणी पुन्हा एकदा उचलण्यास पोद्दार बिल्डरने सुरुवात केली आहे. पोद्दार बिल्डरला धरणातून पाणी साठा मंजूर केला आहे. मात्र पोद्दार कंपनीने पाणी उचलण्यासाठी चक्क धरणातच पंप हाऊस बनविला आहे. त्यांना धरणाच्या खाली विहीर खोदून त्यातील साठलेले पाणी घेण्याची परवानगी दिली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवत असताना शासनाचा पाटबंधारे विभाग मात्र धरणातून पाणी घेण्याची परवानगी देत आहे, याबाबत स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे चाळीस कोटींचे हे धरण पोद्दार बिल्डरला आंदण दिले आहे काय, असा सवाल पाली-भुतिवली धरण संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. पाली-भुतिवली धरणातील २00४ पासून साठून राहिलेले आणि कालवे नसल्याने वापरात नसलेले पाणी बांधकामासाठी मिळावे, अशी मागणी पोद्दार बिल्डरने २०१२ मध्ये केली. त्यावेळी पाटबंधारे विभागाने .०४ टक्के पाणी साठा पोद्दारसाठी मंजूर केला. तो देताना धरणाच्या मुख्य बांधाखाली विहीर खोदून त्यात साठलेले पाणी उचलून नेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पोद्दार बिल्डरने शासनाचे सर्व नियम आणि अटी बाजूला ठेवून थेट धरणात मोटर लावून पाणी उचलण्यास सुरु वात केली आहे. त्या पाण्यावर पोद्दार बिल्डरने तब्बल ४० बिल्डिंग बांधल्या. बिल्डरने तेथे पाली भुतिवली धरणाच्या पाण्यावर नळपाणी योजना तयार केली असून धरणामध्ये तेथे पंप हाऊस बनविला आहे. त्याबाबत गतवर्षी आमदार सुरेश लाड यांनी महावितरण कंपनीने बेकायदा तयार केलेले पंप हाऊस तात्पुरते बंद केले होते. ते करताना पंप हाऊस कायमचे काढून टाकण्याचे काम महावितरणने केले नाही. त्यामुळे आता पुन्हा धरणातील पाणी घेण्यास पोद्दार कंपनीने सुरु वात केली आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश लाड यांचा धरणातून थेट पाणी घेण्यास विरोध असताना पाटबंधारे खाते पोद्दार कंपनीला धरणातून पाणी घेण्यास परवानगी देते याचा अर्थ कर्जतमधील जनतेला अजून समजला नाही. कारण शासनाची परवानगी धरणाच्या खालून पाणी नेण्यास सांगितले असता ते धरणात पंप हाऊस उभारून पाणी उचलण्याची हिंमत करीत आहे, याचा अर्थ समजून येत नाही. पाटबंधारे विभाग पोद्दारला धरणातून पाणीपुरवठा बंद करणार नसेल तर धरण संघर्ष समिती आवाज उठविल, प्रसंगी आंदोलन करील असा इशारा समितीच्या हिराताई दुबे यांनी दिला आहे. धरणातून थेट पाणी उचलण्याचा कधीही प्रकार राज्यात झाला नाही, त्यामुळे पाली धरण शासनाने पोद्दारला आंदण दिले आहे काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. धरण शासनाने पोद्दारला विकले आहे काय? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.