परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानेच तक्रार देण्याची बिल्डरची झाली हिंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:05 AM2021-07-25T04:05:57+5:302021-07-25T04:05:57+5:30

जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे खूप ताकदवान असल्याने जेलमध्ये सडत बसावे ...

The builder dared to lodge a complaint only after Parambir Singh was picked up | परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानेच तक्रार देण्याची बिल्डरची झाली हिंमत

परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानेच तक्रार देण्याची बिल्डरची झाली हिंमत

Next

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे खूप ताकदवान असल्याने जेलमध्ये सडत बसावे लागण्याच्या भीतीपोटी कोट्यवधीची खंडणी वसुली होऊनही गप्प राहिलो होतो, मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्याने पोलीस यंत्रणा आपली फिर्याद घेईल, अशी खात्री पटल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याचे धाडस केल्याची कबुली तक्रारदार बिल्डरने दिली आहे.

त्यांच्या माणसाकडून आपल्याला व कुटुंबीयांना धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी या बिल्डरने केली आहे. भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक व ठाण्यातील यूएलसी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या श्यामसुंदर अग्रवाल याने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह व इतरांविरुद्ध खंडणी वसुलीबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये त्याचा तत्कालीन व्यावसायिक भागीदार संजय पुनामिया यांचे सिंह यांच्याशी असलेले जवळचे संबंध, त्यांनी केलेली वसुली आणि परमबीर सिंह यांना मिळणाऱ्या पोस्टिंगबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. परमबीर हे पुनामिया याच्या सांगण्यावरून आपल्याला खोटे गुन्हे दाखल करून ४, ५ वर्षे जेलमध्ये अडकवतील अशी भीती वाटत होती, त्यामुळे माझी, पुतण्यांची मोठ्या प्रमाणात लूट होऊन, ८ कोटींचा भूखंड १ कोटीला हडप करूनही आम्ही निमूटपणे गप्प होतो, तक्रारही कोणी घेणार नाही असे वाटत होते; मात्र राज्य सरकारने मार्च महिन्यात त्यांची आयुक्तपदावरून होमगार्डला बदली केली, त्यामुळे मुंबई पोलीस तक्रार नोंदवून घेतील, असा विश्वास वाटल्याचे अग्रवाल याने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याच्या जबाबाच्या अनुषंगाने कागदपत्रे, पुरावे तसेच २३ व ३० मार्च २०२१ रोजी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकींचे संभाषण रेकॉर्ड तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याची पडताळणी करून कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पुनामियाला राजकीय वरदहस्त

पोलिसांनी अटक केलेल्या बिल्डर व परमबीर सिंग यांचा निकटवर्तीय संजय पुनामिया याचे राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याची नातेवाईक आमदार असून ठाणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांचा त्याला वरदहस्त आहे. त्यामुळेच यूएलसी घोटाळ्याबद्दल ठाण्याची क्राइम ब्रँच करीत असलेला फेरतपास अडीच महिन्यांपासून सुरू असूनही आणि सबळ पुरावे असतानाही आतापर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे सांगितले जाते.

Web Title: The builder dared to lodge a complaint only after Parambir Singh was picked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.