बिल्डरने बुजवले खाडीपात्र

By Admin | Updated: January 22, 2015 01:38 IST2015-01-22T01:38:25+5:302015-01-22T01:38:25+5:30

तालुक्यातील नागाव परिसरात कायदे धाब्यावर बसवून हिरानंदानी यांच्या डायनॉमिक्स व्हेकेशन प्रा.लि. कंपनीने १५० एकर जमिनीवर भराव केला आहे.

Builder burying cove | बिल्डरने बुजवले खाडीपात्र

बिल्डरने बुजवले खाडीपात्र

आविष्कार देसाई - अलिबाग
तालुक्यातील नागाव परिसरात कायदे धाब्यावर बसवून हिरानंदानी यांच्या डायनॉमिक्स व्हेकेशन प्रा.लि. कंपनीने १५० एकर जमिनीवर भराव केला आहे. त्यामुळे नैसर्गिक खाडीचे पात्र, अंतर्गत पाणलोट मार्ग बुजविल्याने तेथील गावांना धोका निर्माण झाला आहे. स्मशानभूमीची वाट अडविण्याचे कृत्यही कंपनीने केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
याप्रकरणी ग्रामस्थांनी अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना बुधवारी निवेदन दिले. भरावाचे काम बंद करुन संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी केली आहे. कंपनी दादागीरीची भाषा करीत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असेही दांडेकर यांनी ठणकावले.
डायनॉमिक्स व्हेकेशन प्रा.लि.या हिरानंदानी यांच्या कंपनीला नागाव ग्रामपंचायतीने काही अटी शर्तींवर भराव करण्यासाठी परवानगी दिली आहे. नैसर्गिक पाण्याचे मार्ग निश्चित करुन पाण्याचा निचरा होण्यासाठी कॅनॉल बांधण्यात यावेत, त्यामागाची नोंद ले आऊट नकाक्षामध्ये करुन त्याची प्रत ग्रामपंचायतीमध्ये सादर करावी, अशी अट असतानाही संबंधीत कंपनीने प्रत सादर केलेली नसल्याचे ग्रामस्थ मंगेश आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही मात्र कंपनीला मुबलक प्रमाणात पाणी कसे मिळते असा सवाल तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी केला. कंपनी त्या पाण्याचा वापर झाडांना पाणी घालण्यासाठी तसेच भराव केलेल्या भुभागावर पाण्याची उधळपट्टी करीत आहे. त्यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असून भराव करताना खारफुटी वनस्पतींचीही कत्तल केली आहे. पर्यावरणाची न भरुन येणारी हानी झाली आहे.
भरावामुळे सुमारे ५०० एकर शेती, वाड्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कंपनीच्या बेकायदेशीर कामा विरोधात आवाज उठविल्यास त्याला धमकी देणे तसेच पोलिसात खोट्या तक्रारी दाखल करण्याचे भय दाखविले जात असल्याने ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत. याबाबत डायनामिक्स व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

खारगल्ली ग्रामस्थांच्या सर्व्हे नंबर १४९६ या सरकारी जागेत पुर्वांपार स्मशानभुमी होती. तेथे जाणारा मार्गच कंपनीने बंद केला असल्याचे ग्रामस्थ उदय पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्दसनास आणले. याप्रकरणी तातडीने अहवाल मागून डायनॉमिक्स व्हेकेशन कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- सुमंत भांगे, जिल्हाधिकारी

शासनाकडे योग्यती रॉयल्टी भरून कंपनीच्या बिगरशेती जागेत भराव टाकत आहोत. जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असल्यास प्रशासन कारवाई करेल, असे डायनॉमिक्स व्हेकशन कंपनीचे संचालक स्वरुप रेवणकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पाण्याचे नैसर्गिक स्रोत्र बुजविणे, स्मशानभूमिची वाट आडविणे, सीआरझेडचे नियम धाब्यावर बसविणे, खारफुटीची कत्तल करणे, याबाबत त्यांना विचारले असता रेवणकर यांनी दूरध्वनीवर बोलण्यास नकार दिला.

Web Title: Builder burying cove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.