Join us  

दरडीच्या भागात तातडीने संरक्षक भिंती बांधा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 10:36 AM

मुंबई उपनगरातील वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे.

मुंबई : मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

मुंबई उपनगरातील, अन्य  ठिकाणी टेकडीखालील वस्त्यांच्या करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. बैठकीला गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव  श्रीमती शैला ए., आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले सर्वेक्षण

 मुंबईत धोकादायक ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा धोकादायक ठिकाणी दुर्घटना घडू नये, जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

 यासाठी मुंबई महानगरपालिकेने या भागात संरक्षक भिंती बांधण्यासह  इतर आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे.

 मुंबई उपनगरातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयआयटीमार्फत केले असून, त्याची यादी तयार करण्यात आली आहे. अशा संभाव्य धोकादायक भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.

टॅग्स :मुंबईअजित पवार