Join us  

सरकार यावर्षी २० लाख टन डाळींचा करणार बफर स्टॉक; दर नियंत्रणासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:28 AM

आयातीमुळे दर नियंत्रणात राहिल्याचा दावा

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्र सरकार दाळी व तेलबियांचे भडकत चाललेले भाव रोखण्यासाठी यावर्षी डाळींचा बफर स्टॉक १६ लाख टनांऐवजी २० लाख टन करील. त्यात तूर डाळीचा साठा सर्वात जास्त असेल. केंद्रीय ग्राहक कामकाज मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डाळींचे भाव स्थिर ठेवणे व महागाई रोखण्यासाठी हा उपाय आहे. काही दिवसांपूर्वी डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अफ्रिकी देशांतून डाळींची आयात केली होती. सरकारचा दावा आहे की, यामुळे तूर डाळीचा भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे.

हा अधिकारी म्हणाला की, तूर डाळीचा खप देशात सगळ््यात जास्त होतो त्यामुळे सरकारने यावेळी १० लाख टन फक्त तूर डाळीचा बफर स्टॉक बनवणार आहे. तूर डाळीनंतर भाव भडकले ते उडद डाळीचे. त्यामुळे उडद डाळीचाही यावर्षी चार लाख टन बफर स्टॉक बनवला जाईल. हरभरा डाळीचा तीन लाख टन, मसूर १.५ लाख टन आणि मूग डाळीचा एक लाख टन बफर साठा केला जाईल. इतर डाळींचाही जवळपास एक लाख टन बफर स्टॉक बनवला जाईल. त्यामुळे बाजारात मागणी वाढताच डाळींना स्वस्त भावाने तेथे उपलब्ध केले जाईल. पर्यायाने त्यांचे भाव नियंत्रणात राहतील.विदेशी कांद्यामुळे सरकार त्रासलेकांदा फारच महागल्यामुळे त्याची सरकारने टर्की आणि इजिप्तमधून आयात सुरू केली होती. परंतु, दिल्लीत कांदा ४० ते ५० रूपये किलो असल्यामुळे आणि विदेशी कांद्याला खरेदीदार न मिळाल्यामुळे सरकार काळजीत आहे. केंद्राने टर्कीकडून सरासरी ५५ ते ५६ रूपये किलोने कांदा विकत घेतला. तो बाजारात ६० ते ७० रूपये किलोने विकण्याची त्याची योजना फसली. कारण आयात कांद्याला देशी कांद्यासारखा स्वाद नाही. पर्यायाने ग्राहकही. मंत्रालयातील सूत्रांनुसार आताही विदेशांतून १८३०० टन कांदा येणार आहे. अर्धा कांदा यायचा आहे. या परिस्थितीत त्याच्या खपाबद्दल सरकारला चिंता आहे. कारण येत्या १० ते १५ दिवसांत देशातील कांदा मंड्यांत येऊ लागेल व भावही खाली येतील.

टॅग्स :कांदा