टीएमटीचे बजेट १७७ कोटींचे
By Admin | Updated: February 13, 2015 22:42 IST2015-02-13T22:42:35+5:302015-02-13T22:42:35+5:30
ठाणेकर प्रवाशांना चांगल्या सुविधांचा वादा करीत ठाणे परिवहन सेवेने पुन्हा प्रवाशांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. घोडबंदर येथील

टीएमटीचे बजेट १७७ कोटींचे
ठाणे : ठाणेकर प्रवाशांना चांगल्या सुविधांचा वादा करीत ठाणे परिवहन सेवेने पुन्हा प्रवाशांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. घोडबंदर येथील आगारांचा विकास, जेएनएनयुआरएम योजनेतील शिल्लक १९० बस परिवहनमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न, १०० भाडेतत्वावरील बस, इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडीग मशिन कार्यान्वित करणे, सॅटीसवर ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध करणे, परिवहन कर्मचाऱ्यांची देणी देणे आदी जुन्याच बाबींचा समावेश करुन ठाणे परिवहन सेवेने २०१४-१५ चे ११३.८८ कोटी आणि २०१५-१६ चे १७७.७४ कोंटीचे मूळ अंदाजपत्रक शुक्रवारी विशेष समितीला सादर केले.
या अंदाजपत्रकात कोणत्याही नव्या बाबींचा समावेश नसून, ठाणे परिवहन सेवेने पालिकेकडे ४० कोटींचे अनुदान मागितले आहे. यामध्ये महसुली खर्चापोटी ३९.८० कोटी आणि भांडवली खर्चासाठी २० लाखांचा निधी अपेक्षित धरला आहे. याशिवाय २०१४-१५ च्या सुधारीत अंदाजपत्रकातही मार्च १५ अखेर पर्यंत ६.३० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. कर्मचाऱ्यांची ७९.७० कोटींची देणी असून २०१५-१६ मध्ये प्राप्त होणाऱ्या अपेक्षित ८.१० कोटींच्या उत्पन्नातून कर्मचारी थकबाकी पोटी ७ कोटी व सेवानिवृत्त कर्मचारी थकबाकीपोटी १० लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. प्रवासी भाड्यापोटी १३०.४१ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच जाहीरात, विद्यार्थी पासेस, निरुपयोगी वाहन विक्री, पोलीस खाते आदींकडून ६.७५ कोटी, भंगारबस विक्रीपोटी १.४३ कोटी, परंतु दुसरीकडे वाहन दुरुस्ती व निगा यासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तसेच विधी विभागाकडील प्रलंबित विमा दाव्यापोटी ४० लाख, डिझेल, सीएनजीसाठी ६ कोटी अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. नव्या योजनांचा दावा करणाऱ्या परिवहनने घोडबंदर येथील ओवळा आगार, मानपाडा, आगाराचा विकास करणे, नव्याने दाखल होत असलेल्या २२० बसचे नियोजन, इलेक्ट्रॉनिक तिकीटींग व्हेंडीग मशिन यंत्रणा, सॅटीसवर ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध करणे, परिवहनच्या आगारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे या जुन्याच बाबींचा समावेश आहे.