या अर्थसंकल्पाने समाजवादाचे जोखड झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:05 AM2021-02-08T04:05:02+5:302021-02-08T04:05:02+5:30

या अर्थसंकल्पाने समाजवादाचे जोखड झुगारले निर्मला सीतारमन : करदात्यांचा पैसा योग्य पद्धतीनेच वापरायला हवा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

This budget loosened the yoke of socialism | या अर्थसंकल्पाने समाजवादाचे जोखड झुगारले

या अर्थसंकल्पाने समाजवादाचे जोखड झुगारले

Next

या अर्थसंकल्पाने समाजवादाचे जोखड झुगारले

निर्मला सीतारमन : करदात्यांचा पैसा योग्य पद्धतीनेच वापरायला हवा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा सादर केलेला अर्थसंकल्प हा आर्थिक समाजवादाचे जोखड झुगारून देणारा आणि अनेक अर्थांनी दिशादर्शक असल्याचे सांगतानाच करदात्यांचा पैसा योग्य पद्धतीनेच वापरायला हवा म्हणून निर्गुंतवणुकीचे सर्वंकष आणि स्पष्ट धोरण आणल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी स्पष्ट केले.

दादर येथील योगी सभागृहात मुंबई भाजपच्यावतीने उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट आणि व्यावसायिकांसमोर सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंवर भाष्य केले. स्वातंत्र्यानंतर लायसन्स राजमुळे या देशातील उद्यमींना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. अशा निर्बंधातही उद्यमी टिकून राहिल्याचे त्या म्हणाल्या. केंद्राने निर्गुंतवणुकीच्या नावाखाली देशाची संपत्ती विकायला काढल्याच्या विरोधकांच्या आरोपांचा सीतारमन यांनी चांगलाच समाचार घेतला. करदात्यांच्या पैशांवर सरकारी कंपन्या उभ्या आहेत. खरेतर ही संपत्ती आपली ताकद बनेल, अशा पद्धतीने उभारायला हवी होती. मात्र, असंख्य क्षेत्रात सरकारी कंपन्या पसरल्या आहेत. पण, प्रशासकीय कारणांमुळे या कंपन्या स्पर्धात्मक आणि व्यावसायिक गुणवत्ता दाखवू शकत नाहीत, हे वास्तव आहे. अपवाद वगळता सरकारी कंपन्यांची अवस्था फारशी चांगली नाही. करदात्यांचा पैसा योग्य ठिकाणीच जायला हवा, कराचा प्रत्येक पैसा अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने गुंतवला पाहिजे, खर्चिला पाहिजे. यासाठीच मोदी सरकारने सुस्पष्ट असे निर्गुंतवणूक धोरण देशासमोर मांडले आहे.

यापूर्वीच्या प्रत्येक सरकारने तुकड्या तुकड्या खासगीकरणाचे निर्णय घेतले. पण, मोदी सरकारने सर्वंकष धोरण मांडले आहे. यापढे धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकार राहणार आहे. विकासोन्मुख भारताच्या आशा आकांक्षांच्या पूर्तता करू शकतील, अशा सरकारी कंपन्यांना पुढे आणले जाईल, त्यांना सशक्त केले जाईल. करदात्यांनी कर रूपात दिलेला प्रत्येक रुपया योग्य ठिकाणीच गुंतवला पाहिजे. सरकारी कंपन्यात केवळ पैसा ओतत राहण्याचे धोरण आम्हाला मंजूर नाही. कराच्या प्रत्येक रुपयातून अधिकाधिक परतावा मिळायला हवा. गरिबांना सुरक्षा, युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्यमींना नवे अवकाश देत देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी हा कराचा पैसा वापरला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयात शुल्काबाबत सुधारणा प्रस्तावित आहेत. त्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत संबंधित सर्व घटकांशी चर्चा केली जाईल. विचारविनिमयानंतर ऑक्टोबरमध्ये याबाबतच्या सुधारणा निश्चित केल्या जाणार असल्याचेही सीतारमन यांनी यावेळी सांगितले.

चौकट

...तर वीस एसबीआय लागतील

मागच्या अनुभवातूनच आर्थिक क्षेत्रातील सुधारणांना निर्णय घेतला आहे. केवळ सरकारच्या माध्यमातून देशाच्या आकांक्षा आणि विकासाच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी एसबीआयसारख्या वीस संस्था लागतील. त्यामुळेच विकासक वित्तीय संस्था (डीएफआय) ना परवानगी देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

राजकीय लुडबुडीमुळेच बँकांवर बुडीत कर्जाचे डोंगर

काँग्रेस सरकारच्या काळात बँकांची दुरवस्था झाली. केवळ फोन करून नातलग आणि उद्योजकांना भांडवल, कर्ज देण्यास भाग पाडण्यात आले. तत्कालीन नेत्यांच्या या अविचारी कृतीमुळेच बँका बुडीत कर्जाच्या खाईत आहेत. बँकांच्या व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचा आदर करण्याची संस्कृती रूजायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: This budget loosened the yoke of socialism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.