अर्थसंकल्पाचा फुगा फुटला
By Admin | Updated: May 13, 2015 23:47 IST2015-05-13T23:47:56+5:302015-05-13T23:47:56+5:30
महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना २० वर्षांपासून उत्पन्नाचे अवास्तव आकडे दाखवण्याची प्रथा पडली आहे. वास्तवाचे भान न ठेवल्यामुळे अर्थसंकल्पातील

अर्थसंकल्पाचा फुगा फुटला
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना २० वर्षांपासून उत्पन्नाचे अवास्तव आकडे दाखवण्याची प्रथा पडली आहे. वास्तवाचे भान न ठेवल्यामुळे अर्थसंकल्पातील उद्दिष्ट एकदाही साध्य करता आलेले नाही. अनेक वेळा उद्दिष्टांच्या जवळपासही जाता आलेले नाही. आकडे फुगवून नागरिकांचीही दिशाभूल करण्यात आल्याचे उत्पन्नाच्या वास्तव आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे कोणतीही करवाढ न करता उत्पन्न मोठ्याप्रमाणात वाढविण्यात यश आले आहे. उत्पन्नाचा आलेख वाढत आहे, हे खरे असले तरी महापालिकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधी या आकड्यांवर खूश नाहीत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी अवास्तव अर्थसंकल्प तयार करण्याची प्रथा पडली आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढल्याचा भास अर्थसंकल्पातून निर्माण केला जात आहे. परंतु वर्षाच्या शेवटी त्या उद्दिष्टांच्या जवळपासही जाता येत नाही. परिणामी सुधारित अर्थसंकल्प सादर करावा लागतो. १९९५ - ९६ मध्ये ८० कोटी १८ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु वर्षाखेरीस फक्त ३१ कोटी ६४ लाख रुपये उत्पन्न मिळाले. उद्दिष्टापेक्षा ४८ कोटी ५४ लाख रुपये महसूल कमी जमा झाला. तेव्हापासून फसव्या अर्थसंकल्पाची परंपरा आतापर्यंत सुरूच आहे. २० वर्षांत फक्त दोन वेळा उत्पन्नाच्या जवळ जाता आले आहे.