Join us  

Budget 2020: मुंबईतील रेल्वे प्रवाशांना ठेंगा; रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी फक्त ५५० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 5:03 AM

अर्थसंकल्पात अपुरी तरतूद

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना बुलेट ट्रेनला पाठिंबा असल्याचे जाहीर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई महानगरातील प्रकल्प आणि उपनगरीय रेल्वेसाठी तुटपुंजी तरतूद केल्याचे रेल्वेतर्फे बुधवारी जाहीर केलेल्या तपशिलांतून स्पष्ट झाले.

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) मुंबई महानगर परिसरातील वाहतुकीचा चेहरा मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी) हाती घतेलल्या प्रकल्पांच्या दीर्घकाळ रेंगाळलेल्या कामांसाठी अवघी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५७८ कोटी देण्यात आले होते. त्यात २८ कोटींची कपात झाली आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाच्या दुहेरी विद्युतीकरणासाठी १०० कोटींची तरतूद आहे.

एमयूटीपी २ साठी २०० कोटी, एमयूटीपी ३ साठी ३०० कोटी आणि एमयूटीपी ३ अ साठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एमयूटीपी प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक तरतूद करते. एमयूटीपी २ अंतर्गत ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका आणि सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका हे प्र्रकल्प मार्गी लागतील.एमयूटीपी ३ अंतर्गत विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ एसी लोकल हे प्रकल्प मार्गी लागतील.

एमयूटीपी ३ अ अंतर्गत सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० एसी लोकल, पनवेल ते विरार उपनगरी मार्ग, सीबीटीसी नवीन सिग्नल यंत्रणा हे प्रकल्प मार्गी लागतील.एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार एमयूटीपीच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टॅग्स :बजेटभारतीय रेल्वेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेकेंद्र सरकारनिर्मला सीतारामनमुंबईमहाराष्ट्र