Join us  

शेतकरी, कामगार, गरीब आणि सैनिकांचा आत्मविश्वास वाढवणारा अर्थसंकल्प - सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:53 PM

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सन 2020पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलली असून नापिकी आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या अल्पभूधारक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेची घोषणा केली.

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सन 2020पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलली असून नापिकी आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या अल्पभूधारक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. यामध्ये दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट 6 हजार रुपये जमा होणार आहेत. 1 डिसेंबर 2018 पासूनच ही योजना लागू होणार असून 3 हप्त्यात ही रक्कम 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

असंघटित कामगारांसाठी 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना' जाहीर केली असून यामध्ये 15 हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांना पेन्शन, 100 रुपये प्रती महिना भरून 60 वर्षांनंतर महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. याचा फायदा सुमारे 10  कोटी मजुरांना होणार आहे.  तसेच, या सरकारने स्वच्छ भारत मिशन योजना प्रभावीपणे राबविली असून या योजनेतून 5 लाख 45 हजार गावांमध्ये शौचालये उभारली आहेत. 

संरक्षण खात्यासाठी आजवरची सर्वात मोठी तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद केली असून सुमारे 40 वर्षांपासून रखडलेली वन रॅन्क वन पेन्शन योजना सैनिकांना लागू केली. सौभाग्य योजनेतून घरोघरी सन 2021 पर्यंत प्रत्येक गावात वीजजोडणी होणार आहे. आयुष्मान विमा सुरक्षा योजने अंतर्गत दहा लाख जणांवर उपचार झाले असून त्यामुळे गरीबांचे तीन हजार कोटी रुपये वाचले आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख 53 हजार घरे बांधली आहेत. तसेच गरीबांना स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशा पध्दतीने केंद्र सरकाने मांडलेला अर्थसंकल्प हा देशातील शेतकरी, कामगार, गरीब जनता, आणि सैनिकांचा सन्मान करणारा व आत्मविश्वास वाढविणारा आहे. मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.  

 

 

टॅग्स :अर्थसंकल्प 2019इन्कम टॅक्सआयकर मर्यादाशेतकरी