भाईगिरीच्या चसक्याने नेले ‘आत’

By Admin | Updated: April 15, 2015 00:17 IST2015-04-15T00:17:52+5:302015-04-15T00:17:52+5:30

बिपीन पाटीलचा मद्यविक्रीचा व्यवसाय कल्याण-डोंबिवलीत पसरलेला. त्यातून कमावलेला पैसा आणि प्रतिष्ठा, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस असं सर्व काही सुरळीत सुरू असताना भाईगिरीचा सोस पाटीलला नडला.

Brother-in-Chief 'inside' | भाईगिरीच्या चसक्याने नेले ‘आत’

भाईगिरीच्या चसक्याने नेले ‘आत’

बिपीन पाटीलचा मद्यविक्रीचा व्यवसाय कल्याण-डोंबिवलीत पसरलेला. त्यातून कमावलेला पैसा आणि प्रतिष्ठा, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस असं सर्व काही सुरळीत सुरू असताना भाईगिरीचा सोस पाटीलला नडला. पैसा आला की लोक स्टेटस जपण्यासाठी महागड्या गाड्या, आलिशान बंगल्यापासून पेज थ्री पार्ट्यांपर्यंत आपले राहणीमान उंचावतात. पण कंबरेला पिस्तूल खोचून चारचौघात फिरणे, परदेशातल्या गँगस्टरसोबत फोनवरून बोलण्यात पाटीलला स्टेटस जाणवू लागला. हीच हौस त्याला नडली. आज पाटील गँगस्टर रवी पुजारीच्या साथीदारांसोबत मोक्काच्या गुन्ह्यात गजाआड आहे.

वर्ष-दीड वर्षापूर्वी पाटीलची ओळख दया जतनशी झाली. जतन पुजारीचा साथीदार होताच़ त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंदही होती. हे माहीत असूनही पाटीलने त्याला अव्हेरण्याऐवजी आणखी जवळ केले. जतनच्या मध्यस्थीने पाटील पुजारीच्या संपर्कात गेला. वरचेवर या दोघांचे फोनवरून बोलणे सुरू झाले. थट्टामस्करीत भाईगिरीची हौस पुरी करण्याच्या नादात पाटील पुजारीच्या संघटित गुन्हेगारी टोळीत सहभागी झाला़ मात्र बिंग फुटले तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्याआधीच पाटीलला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.
जतनच्या नादाला लागून पाटीलने गेल्या दीडेक वर्षात ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या बड्या व्यावसायिक, राजकारण्यांची महत्त्वाची माहिती पुजारीला पुरवली. त्यात या असामींच्या मोबाइल नंबरपासून कुटुंबांचे इत्थंभूत तपशील दिले होते. त्याचा वापर करून पुजारीने या असामींना कोट्यवधींच्या खंडणीसाठी धमकावले. या धमक्यांना न जुमानणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीलाही ज्यांनी भीक घातली नाही त्यांचा गेम करण्याचे आदेश टोळीला दिले. शूटर, त्यांना लागणाऱ्या शस्त्रांची जमवाजमव झाली. ज्याला ठार मारायचे आहे ते कोण याचाही अभ्यास पूर्ण झाला. हल्ला होणार इतक्यात खंडणीविरोधी पथकाने भांडुपमधून शूटरसह तिघांना अटक केली. चौकशीतून पुजारीचा कट उघड झाला. इतक्यावरच न थांबता खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स आणि त्यांच्या पथकातल्या अधिकाऱ्यांनी या तिघांची चौकशी सुरू ठेवली. त्यातून जतन आणि पाटील यांची नावे व त्यांची भूमिका समोर आली.
पाटील सध्या खंडणीविरोधी पथकाच्या कोठडीत आहे. त्याच्यासह अन्य आरोपींच्या ठावठिकाण्यांवर छापे घातले. त्यात पाटीलच्या घरून अद्ययावत पिस्तूल आणि काही इम्पोर्टेड मोबाइल फोन सापडले. पाटीलची कल्याण-डोंबिवलीत आठेक वाइन शॉप्स होती. तो आपला व्यवसाय आणखी वाढवू शकला असता आणि सहज ऐशोआरामात पुढले आयुष्य जगू शकला असता. मात्र जतनकरवी पुजारीच्या नादाला लागला आणि स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला, अशी प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे अधिकारी व्यक्त करतात.

रवी पुजारीला धक्का !
अनेक वर्षांपासून गँगस्टर पुजारी परदेशात आहे. मात्र ज्यांच्या जिवावर तो मुंबई, ठाण्यातल्या बड्या असामींना खंडणीसाठी धमकावत असे त्यापैकी चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. खंडणीविरोधी पथकाने बिपीन पाटील, दया जतन, तर मालमत्ता कक्षाने अब्दुल्ला शेठ ऊर्फ बाबासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. हा पुजारीला मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.

जयेश शिरसाट, मुंबई

Web Title: Brother-in-Chief 'inside'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.